विमानप्रवासाचे पैसे किरण बेदी परत करणार

October 24, 2011 5:36 PM0 commentsViews: 3

24 ऑक्टोबर

टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदींवर आथिर्क गैरव्यवहाराचा आरोप झाला होता. विमान प्रवासाच्या तिकिटांचा खर्च त्यांनी फुगवून सांगितला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पण आता किरण बेदी विमान प्रवासाच्या खर्चातले जादा पैसे परत देणार आहेत. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे सांगितलंय. विमान प्रवासाच्या बिझनेस क्लासचे पैसे घेऊन इकॉनॉमी क्लासने प्रवास केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पण अशाप्रकारे जे पैसे जमवले, ते स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेला दिले असं स्पष्टीकरण किरण बेदी यांनी दिलं होतं. या मुद्द्यावरुन आरोप व्हायला लागल्यावर त्यांनी सगळ्या संबंधित संस्थांना पैसे परत करण्याची तयारी दाखवलीय. आपण कुठलीच चूक केली नाही. त्यामुळे आपल्याला कुठलाच पश्चाताप नाही. पण लोकांचा गैरसमज होऊ नये, म्हणून आपण पैसे परत करणार आहोत,असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, किरण बेदींनी पैसे परत करण्याची तयारी दाखवली असली तरी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांना ते मान्य नाही. पैसे परत करुन चूक सुधारणार असेल तर ए. राजासुद्धा पैसे देऊन निर्दोष सिद्ध होऊ शकले असते, असा टोला दिग्विजय सिंग यांनी लगावला.

close