चांडाळचौकडी कोण ? काँग्रेसमध्ये अस्वस्थता

October 25, 2011 9:39 AM0 commentsViews: 6

25 ऑक्टोबर

टीम अण्णांवर सरकारमधील चांडाळ चौकडी खोटे आरोप करतेय असा थेट आरोप करत अण्णांनी सरकारला इशारा दिला. अण्णांनी काल आपल्या ब्लॉगवरुन हा हल्लाबोल केला. त्यामुळे आता ही चांडाळ चौकडी कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भ्रष्टाचाराविरोधात जंतरमंतरवर अण्णांनी पुकारलेलं आंदोलन देशव्यापी झालं आणि सरकारला या जनआंदोलनापुढे माघार घ्यावी लागली. पण त्यानंतर टीम अण्णांमधील सदस्यांवर आरोप होऊ लागले. आणि आता या आरोपांना उत्तर देण्यासाठी अण्णा स्वत: मैदानात उतरलेत. आपल्या ब्लॉगमध्ये अण्णा म्हणतात..,

फक्त आरोप करुन बदनाम करणं एवढ्याच उद्देशानं काही लोकांनी हा उद्योग सुरू केला आहे. किरण बेदींवर झालेला आरोप काही नवीन नाही. ही आरोप करणारी मंडळी कोण? ज्यांना लोकपाल बिल नको आहे अशीच मंडळी या आरोप करणार्‍यांमध्ये दिसून येते. मी काँग्रेस सरकारमधील सर्वच मंत्र्यांना किंवा संपूर्ण सरकारला दोष देणार नाही, पण आज सरकारमध्येही काही चांगली माणसं आहेत. मात्र या चांडाळ चौकडीमुळे त्यांची गळचेपी झाली आहे.

चांडाळ चौकडी असा उल्लेख अण्णांनी केला असला तरी प्रत्यक्ष कोणाचं नाव न घेतल्याने हे चौघं कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे. लोकपाल विधेयकाच्या संयुक्त मसुदा समितीमध्ये असलेले कपिल सिब्बल, पी. चिदंबरम तसेच अण्णांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मनीष तिवारी आणि दिग्विजय सिंग यांच्याकडेच अण्णांचा रोख असल्याची चर्चा सुरू आहे.

तर अशा आरोपांना उत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष करा असा सल्लाही अण्णांनी आपल्या सहकार्‍यांना दिलाय. तर सरकारला पुन्हा एकदा इशाराही दिला आहे. हिवाळी अधिवेशनापर्यंत आंदोलन स्थगित केलं आहे, पण कायदा पास न झाल्यास सुरूवातीला विधानसभा निवडणुका होतं असलेल्या पाच राज्यात माझै दौरे सुरू होतील, आणि नंतर राष्ट्रीय निवडणुकांमध्येही देशभर प्रचार करणार आहे.

एकूणच अण्णा विरुद्ध सरकार असा संघर्ष आता तीव्र झालाय, आता सरकार यावर काय भूमिक घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अण्णांचा रोख ज्यांच्यावर असण्याची शक्यता आहे, त्या दिग्वीजय सिंग यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. अण्णांनी चांडाळ चौकडीबद्दल ब्लॉगमध्ये लिहिलंय, पण ते भाग्यवान कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. – दिग्वीजय सिंग

अण्णांची सरकारवर टीका

फक्त आरोप करुन बदनाम करणं एवढ्याच उद्देशानं काही लोकांनी हा उद्योग सुरू केलाय. किरण बेदींवर झालेला आरोप काही नवीन नाही. ही आरोप करणारी मंडळी कोण ? ज्यांना लोकपाल बिल नको आहे अशीच मंडळी या आरोप करणार्‍यांमध्ये दिसून येते. मी काँग्रेस सरकारमधील सर्वच मंत्र्यांना किंवा संपूर्ण सरकारला दोष देणार नाही, पण आज सरकारमध्येही काही चांगली माणसं आहेत. मात्र या चांडाळ चौकडीमुळे त्यांची गळचेपी झाली.

ब्लॉगमध्ये अण्णांचा गौप्यस्फोट

रामदेव बाबांचं आंदोलन रामलीला मैदानावर सुरु असताना माझी आणि रामदेवबाबांची भेट 5 जून रोजी होणार होती. आम्ही दोघं एकत्र येऊ नये म्हणून 4 जूनच्या रात्री दीड वाजता आंदोलनात सहभागी झालेल्या महिला,पुरुष,लहान मुलं यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला. निष्पाप महिलांवर लाठीचार्ज करणं हाच पुरुषार्थ आहे का ? असा प्रश्न उभा राहतो. या महिलांवर लाठीचार्ज करणारे कोण होते? जे आज आरोप करतात तेच होते ना? हे लक्षात येईल

अण्णांची भीती रास्त?

ज्याप्रमाणे टीम अण्णांवर ही मंडळी आरोप-प्रत्यारोप करत आहेत, त्यांना या देशाचे किंवा समाजाचे काहीच देणंघेणं नाही. स्वत:च्या स्वार्थापोटी ही माणसं आरोप करत आहेत. कठोर जनलोकपाल आणू नये म्हणून सरकारवरसुध्दा ही मंडळी दबाव आणू शकतील. यांच्या विचारांचे संसदेमध्ये थोडेफार लोक विरोधी पक्षातही आहेत, त्यांनाही हे हाताशी धरतील हे नाकारता येणार नाहीअण्णांचा सरकारला इशारा

हिवाळी अधिवेशनात कायदा झाला नाही तर विधानसभा निवडणुका लागलेल्या पाच राज्यांमध्ये माझे दौरे सुरु होतील आणि नंतर राष्ट्रीय निवडणुकांमध्ये देशभर प्रचार करणार

अण्णांचं जनतेला आवाहन

देशातील सर्व जनतेनं आपापल्या ग्रामपंचायत आणि ग्रामसभेमध्ये जनलोकपाल विधेयक हिवाळी अधिवेशनात आणावं अन्यथा पुन्हा आंदोलन करावं लागेल, अशाप्रकारचे ठराव करुन पंतप्रधान मनमोहनसिंह, सोनिया गांधी तसंच राष्ट्रपतींकडे पाठवून द्यावेत. देशभरातून किमान 35 ते 40 लाख ठराव जावेत. जनलोकपाल विधेयकाचा ठराव करतानाच राज्यासाठी लोकायुक्त विधेयक आणावं यासाठी मुख्यमंत्री,राज्यपाल यांनाही असे ठराव पाठवावेत.

अण्णांचा रोख नेमका कोणावर आहे? पी.चिदंबरमकपिल सिब्बलमनिष तिवारीदिग्विजय सिंह

close