राज्यावर लोडशेडिंगचं संकट कायम

October 25, 2011 2:49 PM0 commentsViews: 1

आशिष जाधव, मुंबई

25 ऑक्टोबर

राज्यावर कोसळलेलं लोडशेडिंगचं संकट अजूनही कायम आहे. दिवाळीच्या दिवसात तरी राज्यातल्या नागरिकांना दिलासा मिळेल, असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण सरकारचा हा दावा फोल ठरला आहे. ऐन दिवाळीतही अनेक भागात लोडशेडिंग होतंय.ऐन दिवाळीतही सरकारचं विजेचं रडगाणं सुरूच आहे. वीजपुरवठ्याबद्दल दिवाळीमध्ये थोडा दिलासा मिळेल, ही सरकारची वल्गनाच ठरली. सध्या राज्यात 16 हजार मेगावॅट विजेची मागणी आहे. पण त्याप्रमाणात वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे कृषीपंपाची साडेचार हजार मेगावॅटची मागणी फिरत्या प्रमाणात भागवली जातेय. त्यातून जवळपास अडीच ते तीन हजार मेगावॅट वाचवले जात आहे. अशा पद्धतीने 16 हजार मेगावॅटची मागणी 13 हजारवर आणली गेलीय म्हणजेच 3000 हजार मेगावॅट वीज नियंत्रित केली जातेय. याचाच अर्थ असा सध्या राज्यात जवळपास साडेतीन हजार मेगावॅटची प्रत्यक्ष तूट आहे. पण महावितरण मात्र 2000 मेगावॅट तूट असल्याचा दावा करतेय. त्याला मुख्यमंत्रीही दुजोरा देत आहे.

विजेची मागणी आणि उपलब्धता याचं समीकरण जुळवण्यात राज्य सरकार नेहमीच अपयशी ठरलंय. निदान पुढच्या दिवाळीपर्यंत तरी सरकार आपला शब्द पाळेल, अशी जनतेची अपेक्षा आहे.

close