येत्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी !

October 31, 2011 1:30 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर

दिवाळीनंतर आता महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी आपापले डावपेच आखायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीच्या याबद्दलच्याच दोन महत्त्वाच्या बैठका येत्या 1 आणि 2 नोव्हेंबरला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत होती. मुंबईत महापालिकेतला पराभवाचा ठपका पुसण्याचा यंदा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतोय.

याबद्दलच 2 नोव्हेंबरला शरद पवार स्वत: मुंबईमधल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसशी महापालिकेत निवडणूक पूर्व आघाडी करायला राष्ट्रवादी उत्सुक असल्याचं याआधीच स्पष्ट झालंय. पण, राष्ट्रवादी स्वत: कमजोर आहे तिथेच आघाडी करायला उत्सुक असते हा काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे. यातूनच, निवडणूक पूर्व आघाडी कितपत शक्य आहे याचीच चाचपणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार करणार असल्याचं समजतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपात किती जागा मागायच्या याचीही तयारी राष्ट्रवादीने केल्याचं कळतंय.

राष्ट्रवादीनं नक्की काय गणित मांडलंय ?

सध्या नगरसेवक असलेल्या 12 जागांबरोबरच गेल्यावेळच्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर पक्ष जिथे राहीला अशा 39 जागांवरही राष्ट्रवादी हक्क सांगणार आहे. या व्यतिरीक्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक अशा 36 जागा. एकूण 87 ते 90 जागा मागायची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. गेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने अशाच 90 जागा मागितल्या होत्या. त्यावेळी 65 जागांवर अंतिम तडजोडही झाली होती. पण, एका जागेचा आग्रह दोन्ही काँग्रेसनी धरल्यामुळे आगाडी शेवटच्या क्षणी फिस्कटल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही आणि विशेषत: ज्यांना आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये आघाडी करायची नाही अशा नेत्यांनीह स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात असं बोलायला सुरूवात केली आहे.

close