…तर उसाचं कांडंही तोडू देणार नाही !

October 31, 2011 8:26 AM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर

ऊसाला योग्य भाव न मिळाल्यास ऊसाचं कांडंही तोडू देणार नाही असा खणखणीत इशारा शेतकर्‍यांनी कारखानदारांना दिला. तसेच शेतकर्‍यांच्या ऊसाला दरवाढ दिलीच पाहिजे अशी आग्रही मागणी आज पुन्हा एकदा खासदार राजू शेट्टी यांनी केली आज कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 10 वी ऊस परिषद आजपासून होत आहेत. या परिषदेत ऊस दरावर चर्चा केली जाणार असुन यापुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये कोण कोणते निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. खासदार राजू शेट्टी यांनी साखरसम्राटांवर खळबळजनक आरोप केला. सहकारी साखर कारखाने मोडून खाणार्‍या नेत्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. सीबीआय चौकशी झाल्यास अनेक नेते येरवड्याच्या तुरुंगात जातील. खळबळजनक आरोप राजू शेट्टी यांनी केला.

दरम्यान, शेतकरी संघटनेच्या ऊस दर वाढीच्या मागणीचं आंदोलन तीव्र होताना दिसतंय. शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे सरकार गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करत गेल्या काही दिवासापासून ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्नही शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी करत आहेत. पण शेतकर्‍यांच्या या विरोधाला न जुमानता श्रीपूरच्या पांडूरंग साखर कारखान्यानं कारखाना सुरू ठेवला आहे. आपल्या आसपासच्या परिसरातील ऊस पोलीस बंदोबस्तात गोळा करण्यास सुरूवात केलीय. तर काही कारखान्यांनी तीन तारखेपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे आज सांगलीत सांगली जिल्ह्यातल्या घोटखिंडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि गुंडांनी मारहाण केली असा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. पण संचालकांनी या आरोपाचे खंडन केलंय. कारखाने बंद असताना सुद्धा ऊसतोडणी सुरू होती. त्यामुळे ऊस तोडणी थांबवण्यासाठी गेले असता मारहाण झाल्याचं कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.

close