ऊसाबाबत निर्णय घ्या अन्यथा पंढरपूर ते बारामती मोर्चा !

October 31, 2011 3:08 PM0 commentsViews: 8

31 ऑक्टोबर

ऊसउत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्या कारखाने आणि सरकारने मान्य केल्या नाहीत, तर पंढरपूर ते बारामती मोर्चा काढू असा जाहीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कोल्हापुरातल्या जयसिंगपूरमध्ये 10 व्या ऊसपरिषदेत बोलताना शेट्टी यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

उसाला पहिली उचल 2,350रू. आणि अंतिम भाव 2, 700 रु दिला नाही, तर कुठलाही शेतकरी तोड होऊच देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. सहकारी साखर कारखाने मोडून खाणार्‍या नेत्यांची सीबीयाय चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी जमलेल्या शेतकर्‍यांना शपथ देत संघटनेनं अनेक महत्त्वाचे ठरावही पास केले आहेत. या परिषदेला ऊसउत्पादक शेतकर्‍यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

आज कोल्हापुरात उसाच्या प्रश्नी शेतकरी,ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदारांनी गर्दी केली. आपल्या हक्काच्या पिकासाठी योग्यभाव मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांनी एल्गार पुकारला आहे. आज शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत, 'उसाला योग्य भाव न मिळाल्यास ऊसाचं कांडंही तोडू देणार नाही असा खणखणीत इशारा शेतकर्‍यांनी कारखानदारांना दिला.

तसेच शेतकर्‍यांच्या ऊसाला दरवाढ दिलीच पाहिजे अशी आग्रही मागणी आज पुन्हा एकदा खासदार राजू शेट्टी यांनी केली. आज कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 10 वी ऊस परिषद आजपासून होत आहेत.

दरम्यान, शेतकरी संघटनेच्या ऊस दर वाढीच्या मागणीचं आंदोलन तीव्र होताना दिसतंय. शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे सरकार गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करत गेल्या काही दिवासापासून ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्नही शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी करत आहेत.

पण शेतकर्‍यांच्या या विरोधाला न जुमानता श्रीपूरच्या पांडूरंग साखर कारखान्यानं कारखाना सुरू ठेवला आहे. आपल्या आसपासच्या परिसरातील ऊस पोलीस बंदोबस्तात गोळा करण्यास सुरूवात केलीय. तर काही कारखान्यांनी तीन तारखेपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे आज सांगलीत सांगली जिल्ह्यातल्या घोटखिंडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि गुंडांनी मारहाण केली असा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. पण संचालकांनी या आरोपाचे खंडन केलंय. कारखाने बंद असताना सुद्धा ऊसतोडणी सुरू होती. त्यामुळे ऊस तोडणी थांबवण्यासाठी गेले असता मारहाण झाल्याचं कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.

उसाचं आंदोलन पेटलं !

- ऊसदर 2,350 रु. हवा- अंतिम दर 2700 रु. हवा- साखर निर्यातीत वाढ करा- साखर कारखान्यांतल्या गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करा- ऊस उत्पादकांशी चर्चा करा – ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ करा- साखर कामगारांची पगारवाढ करा

close