महिला आरक्षणाचा दिग्गज नगरसेवकांना फटका !

November 1, 2011 5:10 PM0 commentsViews: 12

विनोद तळेकर, मुंबई

01 नोव्हेंबर

मुंबई महापालिकेत पन्नास टक्के महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसला आहे. शिवसेनेच्या जवळपास सगळ्याच अनुभवी पुरूष नगरसेवकांना आपल्यासाठी दुसर्‍या जागा शोधाव्या लागणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे अनेक दिग्गज आणि अनुभवी पुरूष नगरसेवकांना आपली संस्थानं खालसा करावी लागणार अशी चर्चा होतीच. पण आता मुंबई महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर मात्र शिवसेनेच्या जवळपास सगळ्याच अनुभवी नगरसेवकांना स्वत:साठी नवा वॉर्ड शोधावा लागणार आहे.

शिवसेनेचे सध्याचे नगरसेवक असलेले दिलीप शिंदे, सुभाष सावंत, संजय पोतनीस, विलास चावरी, राजा चौघुले, मंगेश सातमकर, संजय अगलदरे, मधुकर दळवी, ऍड. जगदीश सावंत, आशिष चेंबुरकर आणि यशवंत जाधव यांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर परशुराम देसाई, प्रभाकर शिंदे आणि हेमंत डोके यांचे वॉर्ड महिला मागासवर्गासाठी राखीव झालेत. सध्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांचा वॉर्ड अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी तर सभागृह नेता सुनिल प्रभु यांचा वॉर्ड अनुसुचित जमातीसाठी राखीव झाला आहे. बेस्ट समिती अध्यक्ष सुनिल शिंदे यांचा वॉर्डही अनुसुचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

एकीकडे आरक्षणामुळे शिवसेनेचे हे दिग्गज नगरसेवक अडचणीत आहेत. त्यातच रविंद्र वायकर आणि प्रकाश सावंत हे दोन अनुभवी नगरसेवक आमदार झालेत. त्यामुळे या जुन्या जाणत्यांना नवे वॉर्ड मिळवून देताना शिवसेना नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

महापालिकेतली सत्ता म्हणजे पक्षाला आर्थिक रसद पुरवणारी यंत्रणा आणि ही यंत्रणा नीट चालवण्यासाठी अशा अनेक टर्म निवडून आलेल्या अनुभवी नगरसेवकांची गरज लागतेच. त्यामुळे साहजिकच या नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठी एव्हान हालचालीही सुरू झाल्या असतील.

close