मणिपूरमध्ये 92 दिवसानंतरही कोंडी कायम

November 1, 2011 5:34 PM0 commentsViews: 6

01 नोव्हेंबर

गेल्या 92 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मणिपूरमधील जनजीवन ठप्प झालं आहे. स्वतंत्र सदर हिल्सची कुकी आदिवासींची मागणी मान्य करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. केंद्राच्या निर्णयानंतर कुकी आदिवासींनी गेल्या 92 दिवसांपासूनचा रास्ता रोको मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, या मागणीला विरोध करणार्‍या नागा आदिवासींनी आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मणिपूरची कोंडी कायम आहे.

गेल्या 92 दिवसांच्या आंदोलनामुळे मणिपूरची राजधानी इंफाळची स्थिती बिकट झाली आहे, ट्रॅफिक तुरळक आहे आणि रस्त्यांवर लोकांची वर्दळही कमी झालीय. दुसर्‍या दिवशी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर गाड्यांच्या लांबलचक रांग लागली आहे. आजच्या दिवसाचा स्टॉक कधीच संपला आहे. शहरभरातल्या पेट्रोलपंपवर असंच दृश्य पाहायला मिळतंय. जे पेट्रोलपंप सुरू आहेत, त्यांना मोठी सुरक्षा देण्यात आलीय. कारण पेट्रोलचा दर आहे तब्बल 180 रुपये लीटर आणि वर न संपणारी प्रतीक्षा.

30 वर्षांचा पिंटू मणिपूरमध्ये आसाममधून पेट्रोल घेऊन येतो. यासाठी त्याला तब्बल 10 दिवस लागतात. शिवाय रास्तारोको ओलांडून जाण्याचं धाडसही…रस्त्यावरच्या जळालेल्या ट्रकचे अवशेष पार करत त्याला मार्ग काढाला लागतो.

एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती तर मर्यादेच्या बाहेर गेल्या आहेत एका सिलेंडरसाठी तब्बल 1,600 रुपये मोजावे लागत आहे. इथला महागाईचा आकडा धडकी भरवणारा आहे. टोमॅटो 80 रुपये किलो, बटाटे 50 रुपये किलो, आणि कांदे 50 रुपये किलोनं मिळतायत. त्यामुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण झालंय. कुकी आणि नागा आदिवासींच्या संघर्षात मणिपूरची कोंडी झालीय. कुकींनी माघार घेतली असली तरी नागांचं आंदोलन सुरूच राहणार असल्यानं स्थिती बिकट झाली आहे.

close