पुण्यातल्या सर्पोद्यान तलावात मगरी आढळल्या

November 18, 2008 9:17 AM0 commentsViews: 9

18 नोव्हेंबर पुणेनितीन चौधरीपुण्यातल्या कात्रज सर्पोद्यानातल्या तलावात मगरी आढळून आल्या आहेत. त्यामुळे इथे नौका विहार करायला येणा-या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उद्यानाच्यावतीनं मगरींचा शोध घेणं सुरू आहे. पण यामळे तिथली सुरक्षा व्यवस्था मात्र चव्हाट्यावर आली आहे.कात्रज उद्यानातील या तलावात बोटिंगचा आनंद पर्यटक घेतात. पण तिथं मगर दिसल्यानं ही बोटिंग तूर्तास बंद ठेवली आहे. नौका विहार करायला आलेले पर्यटक संदीप आटपाळकर यांनी त्या मगरीचे फोटो काढले. ते सांगतात, आम्ही तलावात बोटिंग करत होतो. टोकाला गेल्यानंतर आम्हाला काहीतर हलताना जाणवलं. त्यानंतर तिथून मगर बाहेर आली. आम्ही तिचे फोटो काढले.या प्रकरणी कात्रज उद्यानाचे अधिक्षक, निलीमकुमार खैरे सांगतात, अजूनही शोध सुरू आहे. आमची दहा माणसं तलावाच्या सर्व बाजूंनी शोध घेत आहेत.या तलावात येणारं पाणी हे कात्रज तलावातून येतं. परंतु मोठा प्रवाह नसल्यानं मगर कुठून आली हा प्रश्न निर्माण झाला आहे. इतक्या दिवसांत कोणत्याही कर्मचा-यास तलावात मगर आढळली नव्हती. पण पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही मगर शोधून काढणं महत्त्वाचं आहे.वर्षभरापूर्वीच इथल्या मोरांच्या चोरीचं प्रकरण उघड झालं होतं आता तलावात मगर आढळल्यामुळे इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

close