काळ्या पैशांच्या यादीत खासदार नाही ; 782 खात्यांची चौकशी

November 1, 2011 5:45 PM0 commentsViews: 3

01 नोव्हेंबर

स्वीस बँकेतल्या 782 भारतीय खात्यांची इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरू आहे. गेल्या वर्षी फ्रान्स सरकारने काळ्या पैशांच्या खातेदारांची यादी भारत सरकारकडे दिलीय. यादीतली नावं उघड करण्याची मागणी भाजपने केली. पण चौकशी पूर्ण झाल्याशिवाय खातेदारांची नावं उघड केली जाणार नाहीत, असं सरकारनं स्पष्ट केलंय. या यादीत भारतातल्या मोठ्या अधिकार्‍यांसह अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं समजतंय. पण खासदारांची नाव या यादीत नसल्याचा दावा इन्कम टॅक्स विभागाने केला.

काळ्या पैशाचा वाद पुन्हा एकदा यूपीए सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. स्विझर्लंडमधल्या एचएसबीसी (HSBC) बँकेत अकाऊंटस असलेल्या भारतातल्या खातेदारांची यादी फ्रान्स सरकारकडून मिळालीय. या यादीत देशातल्या अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळेच ही यादी प्रसिद्ध करायला अर्थमंत्रालय कचरत आहे.

आयबीएन-नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार…

या यादीत 782 भारतीय खातेदारांची नावं त्यांचा अकाऊंटमधला पैसा, पासपोर्ट आणि पत्त्यांच्या तपशीलासह आहेत. जवळपास 25 हजार खातेदारांची नावं असलेली संपूर्ण यादी HSBC चा कर्मचारी हार्व्ह फाल्सियनी यानं चोरली आणि त्यानं ती यादी फ्रान्स सरकारकडे दिली. इन्कम टॅक्स विभागाने आता दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात विशेष तपास विभाग सुरू केले आहेत. आतापर्यंत 69 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅक्स कराराचा भंग होईल असं कारण देत सरकारने खातेदारांची नाव जाहीर करायला आतापर्यंत नकार दिला. ही यादी प्रसिद्ध केल्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढेल अशी भीती यूपीएला वाटतेय. त्यामुळेच या यादीतून कोणत्या धक्कादायक गोष्टी बाहेर पडणार आहेत, याची उत्सुकता वाढलीय.

close