स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकचे 2 क्रिकेटपटू दोषी

November 1, 2011 12:39 PM0 commentsViews: 3

01 नोव्हेंबर

क्रिकेटला काळीमा फासणार्‍या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अखेर लंडन कोर्टाने आपला फैसला सुनावला आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच मोहम्मद आसिफ आणि सलमान बट्ट या दोघा पाकिस्तानी खेळाडूंना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. बट्टवर लाच स्विकारणे, फिक्सिंगच्या कटात सहभाग आणि कोर्टाची फसवणूक असे तीन आरोप ठेवण्यात आले आहेत. तर आसिफवरही फसवणुकीचा आरोप सिद्ध झाला आहे. पण त्याने नक्की लाच घेतली की नाही, म्हणजे त्याला पैसे मिळाले की नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही. तिसरा खेळाडू मोहम्मद आमीरवरचा फैसला अजून राखून ठेवण्यात आला आहे. या खटल्याच्या चौकशी दरम्यान तो माफीचा साक्षीदार झाला होता. आता खेळाडूंना शिक्षा काय होणार हे गुरुवारी ठरणार आहे. सलमान बट्टला सात वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षाही होऊ शकते. यामुळे या खेळाडूंची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आलीय हे नक्की.

स्पॉट फिक्सिंग प्रकरण कसं उघड झालं.

- 28 ऑगस्ट 2010 ला 'द न्यूज ऑफ द वर्ल्ड' या न्यूजपेपरने पहिल्यांदा स्पॉट फिक्सिंग आणि त्यात पाक खेळाडू गुंतल्याची बातमी छापली. – 2 सप्टेंबर 2010 ला आयसीसीने तीन पाकिस्तानी खेळाडूंना निलंबित केलं. – 22 सप्टेंबर 2010ला पाक बोर्डाचे अध्यक्ष इझाज बट्ट यांनी इंग्लिश खेळाडूही फिक्सिंगमध्ये गुंतल्याचा आरोप केला. – 13 ऑक्टोबर 2010 ला इजाज बट्ट यांचा आरोप आयसीसीने फेटाळला.- 3 नोव्हेंबर 2010 ला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीनही खेळाडूंना निलंबित केलं आणि खेळाडूंचे करारही रद्द केले. – 11 जानेवारी 2011 ला आयसीसीनं या प्रकरणी चौकशी पूर्ण केली पण निकाल राखून ठेवला. – 4 फेब्रुवारी 2011 ला खेळाडूंवर लाच स्विकारल्याचा आरोप सिद्ध झाला. – 5 फेब्रुवारी 2011 ला सलमान बट्टवर 10, आसिफवर 7 तर आमीरवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली – 17 मार्च 2011 ला कोर्टाने त्यांची केस दाखल करुन घेतली… आणि खेळाडूंवर विविध प्रकरणात गुन्हेही दाखल झाले. – 4 ऑक्टोबर 2011ला लंडनच्या साऊथवॉर्क क्राऊन कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरु झाली आणि अखेर 1 नोव्हेंबर 2011 ला सलमान बट्ट आणि मोहम्मद आसिफवर आरोप निश्चित करण्यात आले.

close