अयुबच्या उपचारासाठी ईदचा बकरा ठरणार तारणहार

November 2, 2011 10:44 AM0 commentsViews: 6

02 नोव्हेंबर

सध्या मुस्लीम बांधव तयारी करतायत बकरी ईदची.. यासाठी राज्यातल्या कानाकोपर्‍यातून बकर्‍या मुंबईत आणल्या जात आहे. पण यावेळी आलेल्या एका बकर्‍यामुळे एका युवकाच्या दोन्ही निकामी झालेल्या किडन्यांवर उपचार होणार आहेत. ईदच्या दिवशी बकर्‍यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. आणि खास करुन ज्या बकर्‍याच्या अंगावर चंद्रासारखी खूण आढळते त्याला शुभ मानलं जातं. आणि अशा बकर्‍याची बोली जास्त लागते.

मुंब्रा भागातल्या बाजारात,अहमदनगरहून असाच चाँद असलेला बकरा विक्रीला आला आहे. दरम्यान, औषधाच्या दुष्परिणामांमुळे याच भागात राहणार्‍या अयुब खानच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं इथल्या विक्रेत्यांना कळलं. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने अयुबवर उपचारही होऊ शकत नाहीत.

अयुबची ही कैफियत या विक्रेत्यांना कळली. आणि त्यांनी म्हणूनच या बकर्‍यासाठी जी किंमत मिळेल ती अयुबच्या मदतीसाठी देण्याचं ठरवलं आहे. याहीपुढे जाऊन त्यांनी अयुबच्या उपचारासाठी बकर्‍याला जास्त बोली लावण्याचं आवाहनही केलंय. मुंब्रावासीयांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आतापर्यंतची बोली लागली आहे दोन लाख बावीस हजार सातशे शह्याऐंशी रुपयांची. प्रत्येकाने जर श्रध्देला सेवेची आणि मदतीची जोड दिली तर अशा अयुबसारख्या अनेकांना नव्यानं आयुष्य जगता येईल.

close