पुणे पालिका निवडणुकीत काँग्रेसचा सामुहिक नेतृत्वाचा प्रयोग !

November 2, 2011 1:07 PM0 commentsViews: 5

अद्वैत मेहता, पुणे

02 नोव्हेंबर

महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत पुणे काँग्रेसचे गेली दशकभर नेतृत्त्व करणारे पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी जेलमध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्त्वहीन झाली आहे. तर तिकडे पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसला नेताच सापडत नाही.अशात आता सामुहिक नेतृत्त्वाचा प्रयोग केला जातोय.

सध्या पुणे आणि पिंपरीमध्ये काँग्रेस नेतृत्त्वाच्या शोधात आहे. कलमाडी जेलमध्ये असल्याने पुण्याची काँग्रेस सैरभैर झाली आहे. तर रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर पिंपरी – चिंचवडमधील काँग्रेस पोरकीच झालीय. अशातच आता सामुहिक नेतृत्त्वाची टुम काढत हर्षवर्धन पाटील आणि पतंगराव कदम यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात देखील काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढले आणि कोपरखळ्या मारल्या.

सध्या जरी पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असली तरी निवडणुकीत काँग्रेसचा शत्रू नंबर वन हा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे. त्यामुळेच की अजित पवारांचे बारामती जवळचे राजकीय हाडवैरी असलेले हर्षवर्धन पाटील, तसेच कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला विजयाची चव चाखून देणारे पतंगराव कदम या जोडगोळीवर काँग्रेसची भिस्त आहे.

मागच्या निवडणुकीत कलमाडींना बाजूला करण्यासाठी अजितदादांना युतीशी संधान साधून पुणे पॅटर्न अस्तित्वात आणला आता यावेळीही काही नवा पुणे पॅटर्न प्रस्थापित होतो का, याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.

close