मौनानंतर अण्णांचा काँग्रेसला पुन्हा इशारा

November 4, 2011 5:21 PM0 commentsViews: 3

04 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळी राजघाटवर जाऊन गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आपलं मौन सोडलं. मौन सोडताच अण्णांनी पत्रकार परिषद घेतली आणि केंद्र सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. हिवाळी अधिवेशनात सरकारने मजबूत जनलोकपाल विधेयक नाही आणलं तर नाव घेऊन काँग्रेसविरोधात प्रचार करू असा इशारा अण्णांनी दिला.

उत्तराखंड सरकारने सक्षम लोकायुक्त विधेयक मंजूर करून आदर्श ठेवलाय. त्याचं अनुकरण केंद्र सरकारनं करावं असं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेसने हिसारपासून धडा घ्यावा असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसने भ्रष्टाचारात डिग्री घेतली तर भाजपने पीएचडी केली आहे आणि काँग्रेसने हिस्सारपासून धडा घ्यावा असंही अण्णांनी सुनावलं. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या दरम्यान अण्णा प्रचार सभा घेणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलंय. टीम अण्णांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, कोअर कमिटीत बदल, यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी आपली मतं व्यक्त केली.

दरम्यान, आज संध्याकाळी टीम अण्णांने लोकपालच्या मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाग घेतला. खासदारांना लोकपालाच्या अखत्यारीत आणलेच पाहिजे, असा आग्रह अण्णांनी बैठकीत धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. याला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांनी विरोध केला.

कार्पोरेट क्षेत्र, मीडिया आणि बिगर सरकारी संस्थांनाही लोकपालखाली का आणू नये असं लालूंनी विचारलं. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी इतर यंत्रणा आहेत असं टीम अण्णांच्या वतीनं सांगण्यात आलं. स्थायी समितीची ही शेवटची चर्चा होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल संसदेत सादर केला जाणार आहे.

close