भूपेन हजारिका यांचं निधन

November 5, 2011 4:12 PM0 commentsViews: 9

05 नोव्हेंबर

ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका यांचं आज मुंबईत दीर्घआजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मुंबईतल्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दुपारी साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या दहाव्या वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत होते. 8 सप्टेंबर 1926 साली आसाममधल्या सादिया गावात त्यांचा जन्म झाला.

भूपेन हजारिका यांना काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये वेंटिलेटर ठेवण्यात आलं होतं त्यांचं डायलसिस केलं जात होतं. तसेच त्यांच्या दोन्ही किडन्या व्यवस्थित काम करत नव्हत्या. हजारिका यांना निमोनिया झाल्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती त्यांना अखेर 23 ऑक्टोंबरला आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं.

हजारिका यांना जून महिन्यात श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी 8 सप्टेंबरला आपला 86 वा वाढदिवस हॉस्पिटलमध्येच साजरा केला होता. हजारिका यांनी बंगाली, आसामी आणि हिंदीसह अनेक भाषेमध्ये गायन केलं आहे. हजारिका यांनी गायक, संगीतकार, कवी, चित्रपट निर्माता अशी अष्टपैलू कामगिरी बजावली आहे. आसामी लोकसंगीताला त्यांनी जागतिक पातळीवर पोहचवलं. गायक, कवी, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट निर्माता असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे भुपेन हजारिका…

1939 मध्ये पहिल्यांदा त्यांनी इंद्रमालती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत काम केलं. तसेच या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायनसुद्धा केलं आणि तिथूनच त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. सर्वाधिक आसामी गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला. हजारिका यांना 1975 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2001 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच या अगोदर 1992 ला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2009 ला असोम रत्न पुरस्कार आणि 2009 संगीत नाटक अकादमी ऍवॉर्ड पुरस्कार देण्यात आला होता.

close