दरवाढ थांबवा नाही तर पाठिंबा काढू – ममता बॅनर्जी

November 4, 2011 3:44 PM0 commentsViews: 19

04 नोव्हेंबर

पेट्रोलच्या दरवाढीविरोधात यूपीएचे मित्रपक्ष आणि विरोधकांनी सरकावर तोफ डागली. यूपीएचा मित्रपक्ष असलेल्या तृणमुलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी तर सरकारवर जाहीर टीका केली. आणि अशीच दरवाढ होत राहिली तर पाठिंबा काढून घेऊ अशी धमकी दिली. भाजप आणि डाव्या पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. पण दरवाढ मागे घ्यायला सरकारने नकार दिला.

पेट्रोलच्या दरवाढीवर यूपीए सरकारमधल्या मित्रपक्षांकडूनच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर सरकारला अल्टिमेटमच दिला. पेट्रोल दरवाढीनंतर त्यांनी तृणमुलच्या खासदारांची बैठक घेतली. आणि सरकारला खणखणीत इशारा दिला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'पेट्रोलची दरवाढ करण्यापूर्वी सरकारने तृणमूल काँग्रेसशी चर्चा केली नाही. आम्ही सरकारला धमकी देत नाही आहोत. पंतप्रधान देशात परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू. पुन्हा दरवाढ सहन करणार नाही, असा निर्णय आमच्या खासदारांनी घेतला. दरवाढ अशीच होत राहिली तर आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ.'

दरवाढीच्या मुद्द्यावर यूपीएतील मतभेद स्पष्ट दिसत आहे. पेट्रोलच्या किंमतीवर सरकारी नियंत्रण नसल्याने दरवाढ रोखण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सरकार खूप काही करू शकत नाही. पण संतप्त ममता, दुखावलेला द्रमुक आणि नाराज राष्ट्रवादी सरकारची अडचण वाढवू शकतात. महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारवर तोफ डागली. आपण चलनवाढीविरोधातल्या उपायांच्या बाजूने आहोत की सामान्य माणसाच्या हे यूपीएच्या मित्रपक्षांनी ठरवावे असं माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

संसदेच्या गेल्या काही अधिवेशनांत महागाईचा मुद्दा कळीचा ठरला आहे. आता हिवाळी अधिवेशन तोंडावर आलंय. त्याचवेळी झालेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे अधिवेशन तापणार असं दिसतं आहे.

महागाई म्हणजे हळूहळू येणारं मरण : केरळ हायकोर्ट

तर दुसरीकडे, वाढती महागाई म्हणजे हळूहळू येणारं मरण आहे, असं कठोर मत केरळ हायकोर्टाने व्यक्त केलं. वाढत्या महागाईविरोधात लोकांनीच आवाज उठवावा, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. काँग्रेसचे माजी खासदार पी. सी. थॉमस यांनी महागाईविरोधात याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीवेळी कोर्टाने हे मत व्यक्त केलं.

close