ब्लॉगरने विश्वासघात केला – अण्णा हजारे

November 5, 2011 3:54 PM0 commentsViews: 8

05 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या ब्लॉगवरून निर्माण झालेल्या वादाने आता वेगळं वळण घेतलं आहे. आपला ब्लॉगरनी विश्वासघात केला, ब्लॉगरच घरचा भेदी निघाला असा आरोप अण्णांनी केला. तसेच आपण आपला ब्लॉग बंद करणार नसून तो आता नव्याने लिहणार आहे असंही अण्णांनी स्पष्ट केलं. ब्लॉगच्या झालेल्या गैरवापराबाबत अधिक चौकशी करून पुन्हा प्रतिक्रिया देऊ असंही अण्णा म्हणाले. लोकपालच्या मुद्द्यावर दिल्लीतल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाग घेतल्यानंतर अण्णा हजारे राळेगणमध्ये दाखल झाले यावेळी अण्णांनी हा आरोप केला.

आज सकाळी अण्णांनी दिल्लीत ब्लॉगरनं केलेल्या ब्लॉगच्या गैरवापरामुळे ब्लॉग बंदच करणार असल्याचे अण्णांनी जाहीर केलं. ब्लॉगवरचे पत्र म्हणजे आपल्या बदनामीचा कट असल्याचा संशयही अण्णांनी व्यक्त केला. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहे. ब्लॉगवरचं हे पत्र हा त्याचाच भाग असावा असं अण्णांनी म्हटलं. पत्रावर जर माझी सही असेल तरच ते खरं समजावे असंही अण्णांनी स्पष्ट केलं.

ज्या ब्लॉगवरुन अण्णा जनतेला संदेश देतात, आंदोलनाला दिशा देतात त्याचं ब्लॉगचा ब्लॉगरने स्वत:चा बचाव करण्यासाठी वापर केल्याने टीम अण्णामध्ये खळबळ माजली. अण्णांच्या ब्लॉगवरुन ब्लॉगरने टीम अण्णांवरच टीका केली होती. ब्लॉगरनी, अण्णांचे हस्तलिखीत पत्रच ब्लॉगवर प्रसिद्ध केलं. टीम अण्णांची पुनर्रचना करण्यासंदर्भात अण्णा हजारे यांनीच लिहून दिल्याचा दावा ब्लॉगरनी केला. अण्णांनी काल केलेल्या टीकेमुळे व्यथित झालो असल्याचंही ब्लॉगरनी म्हटलं आहे. या सगळ्या वादावर स्वत: अण्णांनी स्पष्टीकरण देत आपण ब्लॉगच बंद करत असल्याचे जाहीर केलं होतं. आता अण्णांनी आपल्या ब्लॉगरला घरचा भेदी निघाला असा आरोप करत आपण आपला ब्लॉग बंद करणार नाही असं स्पष्ट केलं.

close