पेट्रोल दरवाढीवरून राष्ट्रवादीही सरकारवर नाराज

November 5, 2011 4:53 PM0 commentsViews: 1

05 नोव्हेंबर

पेट्रोलपाठोपाठ डिझेल, घरगुती गॅस आणि केरोसिनवरचंही नियंत्रण हटवण्याचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले होते. पण या मुद्द्यावर यूपीएतल्या घटकपक्षांनी आता सरकारविरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली. राष्ट्रवादीनंही नाराजी व्यक्त केली. वाढत्या दबावामुळे डिझेल आणि एलपीजी (LPG)चे दर आताच वाढणार नसल्याची माहिती सरकारमधल्या सूत्रांनी दिली.

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता राष्ट्रवादीनंही पेट्रोल दरवाढीवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीने सरकारला इतर पर्याय अवलंबण्याचा सल्ला दिला. आणि दरवाढीच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याचं सांगितले. वाढत्या दबावामुळे डिझेल, घरगुती गॅस आणि केरोसिन यांच्यावरचे नियंत्रण उठवण्याचा निर्णय घेणं सरकारला कठीण जाणार आहे. त्यामुळे आताच या इंधनांच्या किंमती वाढण्याची शक्यता नाही. याबाबत होणारी मंत्रिगटाची बैठकही लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी इतर इंधनांवरचंही नियंत्रण हटवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. पण काँग्रेस आणि सरकारमधल्याच अनेकांचा याला विरोध आहे. काँग्रेसच्या निर्णयांची किंमत आपण का चुकवायची असा प्रश्न मित्रपक्ष विचारत आहे. जागतिक दरवाढीमुळे सध्या पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा होत असल्याचे कारण इंधनावरचे नियंत्रण हटवण्यासाठी सरकार देतंय. पण सरकारचा हा युक्तिवाद मित्रपक्ष आणि मतदार स्वीकारणार नाहीत, याची वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराला तोंड देणार्‍या काँग्रेसला जाणीव झाली आहे.

close