ऊस दरवाढीवर तोडगा नाहीच !

November 8, 2011 9:41 AM0 commentsViews: 1

08 नोव्हेंबर

ऊसदराचं आंदोलन चिघळल्यामुळे त्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज बैठक घेतली. पण आज त्यात कोणताच निर्णय झाला नाही. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रश्नावर सविस्तर चर्चा होणार आहे. सरकारने नेमकी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ऊस दरवाढीचा मुद्दा अधिकच पेटलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री शरद पवार यांच्या बारामतीला धडक दिली आणि तिथं उपोषण सुरू केलं. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांची बैठक बोलावली. पण त्यात काही निर्णय झाला नाही. मात्र सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी दाखवली. पण त्यांनी सांजस्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन केलं.खासदार राजू शेट्टी यांनी या सरकारच्या चर्चेच्या तयारीचं स्वागत केलंय. पण सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. आघाडीच्या बंधनामुळेच सरकारला निर्णय घ्यायला अडचण होत असावी, असं शेट्टी यांचं म्हणणं आहे.

शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सुरू केलेल्या ऊसदराच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळतोय. शिवसेना, भाजप आणि मनसेनंही या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. आंदोलन तापत असलेलं पाहून आता सरकारने चर्चा करण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, ऊसदरवाढीच्या मुद्यावरुन आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी उसाला 2,300 रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तर राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला भाजपनंही पाठिंबा दिला.आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी बारामतीत राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

सरकारने शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केलीय. दरम्यान, राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे सर्व आमदार बारामतीकडे गेले आहेत. राजू शेट्टींची भेट घेऊन हे कार्यकर्ते त्यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत.

close