ऊस दरवाढीच्या आंदोलनाचा भडका

November 8, 2011 6:21 PM0 commentsViews: 3

08 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरवाढीच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपोषणाला 24 तास उलटून गेले आहेत. राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा वाढतोय. राज्यभरातील शेतकरी बारामतीमध्ये येत आहे. त्याचबरोबर विरोधीपक्षांनी राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी राजू शेट्टींची भेट घेतली. सरकारने तोडगा काढला नाहीतर, भाजपही आंदोलनात उतरले असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला. तसेच मनसे आमदार राजू शेंट्टींना भेटण्यासाठी आज बारामतीत दाखल होत आहे.

राजू शेट्टी यांनी कालपासून बारामतीमध्ये उपोषण सुरू केलं. राज्यभरात शेतकर्‍यांनी आंदोलन तीव्र करत अनेक ठिकाणी आंदोलन केली. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. सरकारनं योग्य चर्चा केली तरच तडजोड होऊ शकते, असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. ऊऊसाला पहिली उचल 2 हजार 350 रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. ऊसाचा दर निश्चित होईपर्यंत ते उपोषण करणार आहेत.तर ऊसाच्या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिलाय. शिवसैनिकांनी सोलापुरात सोलापूर- पुणे हायवेवर चक्का जाम केला. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर पंंढरपुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला काही गुंडांनी बेदम मारहाण केली. त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

इंदापूरमध्ये नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणार्‍या 100 बैलगाड्यांचे टायर फोडण्यात आले. शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी हे टायर फोडले. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ऊसपुरवठा ठप्प झाल्याने कारखाना बंद पडला आहे.

सांगलीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध आणि भाजीपाल्याच्या गाड्या अडवल्या. पुणे-बंगळुरू हायवेवर येडेनिपाणी इथं हे आंदोलन केलं.यावेळी 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईकडे जाणार्‍या दूध, भाजीपाल्याच्या गाड्या अडवण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी नुकताच दिला होता. त्यानुसार हे आंदोलन सुरू झालं आहे.

close