काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा !

November 8, 2011 12:15 PM0 commentsViews: 1

08 नोव्हेंबर

राणे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आता पेटला आहे. पण गेल्या वर्षभरातही काँग्रेस-राष्ट्रवादीत सत्तेचा संघर्ष पहायला मिळाला. आदर्श घोटाळ्याचा धसका घेऊन काँग्रेस हायकमांडने दिल्लीत रमलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात पाठवलं खरं. पण गटातटाच्या राजकारणापासून कायम अलीप्त राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाणांच्या मर्यादा महाराष्ट्रातल्या हेव्यादाव्याच्या राजकारणात उघड झाल्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उतावळेपणा सर्वांना दिसला.

परस्पर विरोधी कार्यशैलीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये ताळमेळ कधी दिसलाच नाही.आधीपासूनंच अजित पवारांनी, पृथ्वीराज चव्हाणांना शह देण्यास सुरुवात केली. प्रत्येक खात्याच्याच नाही तर विषयांच्या देखील स्वतंत्र बैठका घ्यायला सुरुवात केली आणि तिथूनंच मुख्यमंत्री विरुध्द राष्ट्रवादीचे मंत्री,उपमुख्यमंत्री विरुध्द काँग्रेसचे मंत्री असा कलगीतुरा सुरु झाला.

अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना आणि आमदारांना निधी वाटपात दुय्यम वागणूक देणं, 13 जुलैच्या मुंबई बॉम्बस्फोटाचे वेळी गृहखात्याच्या कारभारावर पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर नाराजी व्यक्त करणे, राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला शह देणे, काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांना कोंडीत पकडून पाण्याचा प्राधान्यक्रम बदलून घेणं असा शह कटशहाचा सामना आघाडीत अनेक वेळा रंगला. मंत्र्या मंत्र्यांमध्ये, मंत्रिमंडळ बैठकीत किंवा जाहीर वाद घडणं ही तर नित्याचीच बाब होऊन बसली आहे.

आघाडीत हा असा बेबनाव असल्यामुळे राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि कार्यकक्षाही अद्याप ठरवली गेली नाही. तसेच वेळोवेळी राष्ट्रवादीकडून आणखी एका कॅबीनेट पदाची मागणी होत असल्यामुळे काँग्रेसला आपल्या मंत्रिपदाच्या रिकाम्या जागा भरण्याचा मुहूर्त सापडलेला नाही.

close