संघटनेच्या निष्काळजीमुळे नीरजने पाय गमावला

November 8, 2011 3:01 PM0 commentsViews: 2

08 नोव्हेंबर

स्पोर्ट्स संघटकांच्या निष्काळजीपणामुळे एका खेळाडूने आपला पाय गमावला आहे. ऍथलिट नीरज सिंग रांचीतली स्पर्धा आटोपून रेल्वेने परतत असताना त्याला अपघात झाला. नीरज हा हातोडाफेक म्हणजे हॅमर थ्रो क्रीडाप्रकारातला स्टेट चॅम्पियन आहे. स्पर्धेनंतर महाराष्ट्राची टीम घरी परतत होती. तेव्हा त्यांच्याबरोबर महाराष्ट्र ऍथलिट संघटनेतर्फे कोणीही अधिकारी किंवा कोच सोबत नव्हते. ज्युनिअर गटातली 50 च्या वर मुलं रांचीहून एकट्याने प्रवास करत होती. गाडी वर्ध्याजवळ असताना मोबाईल चार्ज करण्यासाठी नीरज लॉबीत उभा होता. तेव्हा दाराचा धक्का लागून तो खाली पडला. यात तो जबर जखमी झाला. तिथून लगेचच त्याला सेवाग्राममधल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. पण त्याचा पाय कापावा लागला. या अपघातामुळे नीरजची कारकीर्द मात्र संपुष्टात आली.

नीरजच्या अपघाताच्या बातमीने त्यांच्या घरच्यांवर दुखाचा डोंगर कोसळला. नीरज ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये राहतो. अपघाताची बातमी कळताच त्याचे आई आणि वडिल तातडीनं वर्ध्याला रवाना झाले. नीरजकडून घरच्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या पण आता त्याची कारकिर्दीच संपुष्टात आली आहे. नीरजच्या अपघाताला महाराष्ट्र संघटना आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप नीरजच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान, आयबीएन लोकमतवर ही बातमी बघितल्यानंतर नीरजसाठी मदतीचा एक हात पुढे आला. नीरजची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. आणि त्यामुळे त्याच्या उपचारांचा खर्च उचलण्याची जबाबदारी युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी उचलली.

close