पृथ्वीराज चव्हाण सरकारला आज एक वर्ष पूर्ण

November 11, 2011 5:55 PM0 commentsViews: 5

आशिष जाधव, मुंबई

11 नोव्हेंबर

राज्यातल्या पृथ्वीराज चव्हाण सरकारला येत्या 11 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण होतं आहे. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये ताळमेळ नसल्याने राज्यातल्या विकास कामाचा वेग मंदावला आहे. तसेच अनेक चांगले निर्णय घेण्याची संधी या सरकारने घालवली असंच सध्याचं चित्र आहे.

आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण वर्षभराच्या कारभारात पृथ्वीराज चव्हाणांना राज्याच्या विकासासाठी फार काही करता आलेलं नाही. उलट त्यांच्यावर राजकीय इच्छाशक्ती न दाखवणारा ब्युरोक्रॅटिक सीएम..सीएम.. असा ठपका ठेवला गेला. त्यामुळे नेमंक वर्षपूर्तीच्या वेळीच त्यांना परत दिल्लीत बोलवलं जाईल अशा वावड्या काँग्रेस पक्षातूनच उठत आहेत.

मुख्ममंत्री झाल्यावर पृथ्वीराज चव्हाणांसमोर खरं आव्हान होतं ते सर्वसामान्यांच्या मनात पुन्हा एकदा प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करण्याचं. त्यामुळे आदर्श घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी लावण्याबरोबरच या घोटाळ्याशी जोडले गेलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातील अनेक निर्णयाना स्थगिती देऊन त्याचा फेरआढावा घेण्याचे पाऊल त्यांना उचलावं लागलं.

पृथ्वीराज चव्हाणांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. भौगोलिक अनुशेषाचा फेरआढावा घेण्यासाठी डॉ. विजय केळकर समिती, शेतकर्‍यांच्या बिनव्याजी कर्जात वाढ, पाण्याच्या प्राधान्यक्रमात बदल करुन शेतीला अग्रक्रम, शालेय शुल्क नियमन कायदा करण्यात आला. नवी मुंबई विमानतळ आणि जैतापूर प्रकल्प यांना पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली खरी पण त्यांच्या कामांना अद्याप गती मिळालेली नाही.

राजकीय कुरण बनलेल्या राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचं धाडस पृथ्वीराज चव्हाणांनी दाखवलं. पण त्याचवेळी साखर कारखानदारीला कोट्यवधींच्या कर्जाची थकहमी दिली. हीच बाब अनेक महत्त्वाच्या योजनांबाबत झाली. अलिकडेच रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारने नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला जाब विचारला.

तसेच मेळघाटसह राज्याच्या दुर्गम भागात कुपोषणाचे प्रमाण वाढलंय. शेकडो कोटींचे सामंजस्य करार झाले पण पुणे परिसरात आलेल्या अनेक लहानमोठ्या उद्योगांनी राज्याबाहेर पळ काढला. शाळांची पटपडताळणी करुन बोगस विद्यार्थी शोधण्याचं काम झालं. पण अद्याप ठोस कारवाई कुठेही झालेली नाही. गेल्या वर्षभरात निर्णय अनेक घेतले गेले. पण ते घेताना पृथ्वीराज चव्हाणांचा कणखरपणा कुठेही दिसला नाही हे मान्य करावाच लागेल.

close