सरदारपुरा दंगलीप्रकरणी 31 दोषींना जन्मठेप

November 9, 2011 5:35 PM0 commentsViews: 4

09 नोव्हेंबर

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या जातीय दंगलीतप्रकरणी एकूण 9 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी एका खटल्याचा निकाल आज लागला. सरदारपुरा दंगल प्रकरणी स्पेशल कोर्टाने 31 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मेहसाणातल्या सरदारपुरा गावात 2002 साली जातीय दंगल उसळली. यात 33 जणांना जिवंत जाळण्यात आलं. या प्रकरणी मेहसाणा स्पेशल कोर्टाने 31 जणांना दोषी ठरवलं आणि त्यांना जन्मठेप सुनावलीय. पण या प्रकरणातल्या इतर 42 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर 31 जणांना संशयाचा फायदा देत सुटका करण्यात आली.

2002 साली झालेल्या गोध्राकांडानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगली उसळल्या. त्यापैकी सरदारपुरामध्ये उसळलेली दंगल सर्वात भयावह होती. सरदारपुर्‍यात 1 आणि 2 मार्च 2002 रोजी जमावाने शेख मोहल्ल्यात हल्ला चढवला आणि एका घरात लपून बसलेल्या 31 जणांना जिवंत जाळण्यात आलं. सुरुवातीला गुजरात पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. पण या तपासाविषयी शंका उपस्थितझाल्या.

त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा तपास स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजेच एसआयटी (SIT) कडे सोपवला. एसआयटीनं या प्रकरणी 73 जणांवर आरोपपत्र दाखल केले. इतक्या वर्षानंतर निकाल लागल्यामुळे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आनंद झाला. पण आणखी मोठी लढाई लढायची, असं त्यांचं म्हणणं आहे.

2002 साली झालेल्या दंगलींप्रकरणी एकूण 9 खटले दाखल झाले आहेत. त्यापैकी फक्त एका प्रकरणाचा निकाल लागला. इतर 8 खटल्यातील दंगलपीडित अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

close