ऊस दरवाढ चर्चा फिसकटली

November 10, 2011 2:38 PM0 commentsViews: 1

10 नोव्हेंबर

ऊसाचा दर ठरवण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चा फिसकटली. आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुण्यातल्या साखर संकुलात चर्चेची तिसरी फेरी झाली. पण त्यात कोणताच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता पुन्हा उद्या दुपारी दीड वाजता चर्चेची चौथी फेरी होणार आहे.

ऊसाला कमाल 2250 ते किमान 2200 पर्यंत दर स्वीकारण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टींनी दाखवली होती. त्यामुळे आजची चर्चा सकारात्मक सुरु आहे असं सांगितलं जात होतं. संध्याकाळपर्यंत तोडगा निघण्याचे संकेतही मिळाले होते. पण दरवाढीवर सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलं नाही.

चर्चेत भाग घेतलेल्या तिन्ही शेतकरी संघटनांनी ऊसाला 2,250 रुपये दराची तयारी दाखवली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे (शरद जोशी गट) अनिल धनवट, शेतकरी संघटनेचे (रघुनाथदादा गट) – रघुनाथदादा पाटील सहभागी होते.

तर दुसरीकडे क्रांतीसिंह नाना पाटील यांची मुलगी हौसाताई पाटील यांनीसुद्धा आज राजू शेट्टी यांची भेट घेतली. हौसाताई पाटील यांनीही सरकारवर चांगलीच टीका केली. आमचा अंत बघू नका, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

close