विदर्भात 7 दिवसात 22 शेतकर्‍यांची आत्महत्या

November 11, 2011 5:58 PM0 commentsViews: 17

नरेंद्र मते, वर्धा

11 नोव्हेंबर

शेतकर्‍यांना उसाच्या दरासाठी लढावं लागतंय. तर विदर्भात कापूस उत्पादक शेतकरी चांगलं पीक येऊनही मेटाकुटीला आला. विदर्भात गेल्या सात दिवसात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा 22 वर गेला आहे. आणि दुसरीकडे, अब्जावधींची संपत्ती बाळगणार्‍या उद्योगपती विजय माल्यांवर सरकार मेहेरबान झालं आहे. शेतकर्‍यांना रास्त भाव न देणारे सरकार त्यांना मदत करण्याचा विचार करतं आहे.

कापसाचे चांगले उत्पन्न येऊनही विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. गेल्या 7 दिवसांत विदर्भात 22 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे. आणि तरीही सरकारने अजूनही कापूस खरेदीची सुरुवातही केलेली नाही. या शेतकर्‍यांचा वाली कोण, असा प्रश्न शेतकर्‍यांचे नेते सरकारला विचारत आहे.

वर्धा येथे राहणार्‍या चंदाबाई जीवन रघटाटे. जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या रेहकी गावात राहतात. यांच्याकडे 6 एकर ओलीताची जमीन आहे. पण तरीही वेगवेगळ्या बँँकांचे 6 लाख रुपये कर्ज झालं. त्याची परतफेड करणं कठीण झालं. त्यामुळे यांच्या नवर्‍याने 4 नोव्हेंबरला विष घेऊन आत्महत्या केली. नवरा गेल्याचे दुख: तर आहे. पण त्याहीपेक्षा आता घर कसं चालवायचं असा प्रश्न चंदाबाईंना पडला. विदर्भात कापूस आणि सोयाबीन ही महत्त्वाची पिकं आहेत. पण भावच मिळत नाही. त्यामुळे मोठं उत्पन्न होऊनही शेतकर्‍याच्या गाठीला पैसा येत नाही.

ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. पण विदर्भातील नेते कापसाला चांगला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरणे तर सोडा अजून कापसाला भाव जाहीर का केला नाही असा जाबसुद्धा विचारत नाही.

close