किंगफिशर एअरलाईन्स आर्थिक संकटात

November 11, 2011 5:23 PM0 commentsViews: 12

11 नोव्हेंबर

देशातल्या मोठ्या एअरलाईन्सपैकी एक असलेल्या किंगफिशर एअरलाईन्सवर आर्थिक संकट कोसळलं आहे. किंगफिशरला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आता सरकार पुढे आलं आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी बँकांशी बोलणी करण्याची शक्यता आहे.

किंगफिशर एअरलाईन्सपुढच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. एअरलाईन्ससाठी विमानतळावरच्या सोयी पुरवणार्‍या कर्मचार्‍यांसुद्धा काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. या कर्मचार्‍यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. तिकडे दिल्लीत किंगफिशरचे मालक विजय माल्या यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री वायलर रवी यांची भेट घेतली. किंगफिशरला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी बँकांशी चर्चा करतील, असं आश्वासन रवी यांनी दिलं.

नागरी हवाई वाहतूक मंत्री वायलर रवी म्हणतात, पॅकेजसाठी सरकारकडून कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. माल्या यांनीसुद्धा पॅकेज मागितलेलं नाही. त्यांनी फक्त मदतीचं विनंती केलीय.

पण एअरलाईन्समधल्या सुत्रांनुसार किंगफिशरला कर्ज देण्यासाठी बँका फारशा उत्सुक नाहीत. त्यामुळे सरकारला अधिक प्रयत्न करावे लागतील. अस्थिर बाजार आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे कर्ज देणं बँकांसाठी अडचणीचं ठरेल. सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी किंगफिशरला जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या वर्किंग कॅपिटल लोणची गरज आहे.

संजय अग्रवाल म्हणतात, आम्हाला मोठं भांडवल उभारायचंय. त्यासाठी प्रयत्नही सुरु आहे. पण जागतिक आर्थिक मंदी, इंधनाचे वाढते दर यामुळे अडचणी येत आहे. किंगफिशरला ऑईल कंपन्यांचे 200 कोटी रुपये देणं आहे. त्यामुळे या कंपन्यांनीसुद्धा इंधन पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. विमानतळ प्रशासनही किंगफिशरवर बंदी घालण्याची शक्यता आहे. पगार न मिळाल्यामुळे पायलट्ससुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत विजय माल्या यांना आता फक्त नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडूनच मदतीची आशा आहे.

close