शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या ठाण्याचा विकास किनार्‍यावरच !

November 11, 2011 5:41 PM0 commentsViews: 8

विनय म्हात्रे, ठाणे

11 नोव्हेंबर

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजूनपर्यंत रंग चढलेला नाही. यावेळी ठाणेकर पालिकेची सत्ता कोणाच्या हाताता देणार यावर तर्क वितर्क चालू आहेत. पण मागील अनेक वर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेमापोटी सत्ता ठाणेकरांनी सेनेच्या हाती दिली. पण शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या असलेल्या ठाण्याच विकास खरंच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालाय का ?

'माझं ठाणे …ठाण्याचा मी' असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठणकावून सांगतात. म्हणूनच 2007 च्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी ठाणेकरांना साष्टांग दंडवत घातला होता. या दंडवतानंतरच ठाणेकरांनी सत्ता पुन्हा शिवसेनेतच्या ताब्यात दिली. ठाण्यावर असलल्या प्रेमापोटी बाळासाहेब ठाण्याच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेऊन असतात. पण त्यांना अपेक्षित असलेल्या ठाणे शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठाणे शहर असावे, ठाणेकरांना 24 तास पाणी मिळावे, ठाण्याला लाभलेल्या खाडीकिनार्‍यांचे सौंदर्यीकरण व्हावं असा शिवसेनाप्रमुखांची अपेक्षा होती. त्याचबरोबर शहराचा विकास होत असतानाच जुन्या ठाण्याच्या सौंदर्याची जपणूक व्हावी आणि ठाण्याचं भूषण असणार्‍या तलावांचा सुशोभिकरण व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती.

पण प्रत्यक्षात आज ठाण्याची अवस्था पाहिली तर शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नांची ऐशीतैशी झाल्याचंच दिसतंय. ठाण्याला अनधिकृत बांधकामांचा वळसा पडला आहे. रस्ते फेरीवाल्यांच्या तर फूटपाथ दुकानदारांच्या कब्जात आहेत. शहरांतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला. शिक्षण आणि आरोग्याच्या अपुर्‍या सोयींनी नागरिक त्रस्त आहेत. आणि विकासाच्या नावाखाली शहर बेबंद आणि बेढबपणे वाढतंय.

सत्ताधारी मात्र विकासाचं गुणगानं गाण्यात मग्न आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नांची पूर्तता तर सत्ताधार्‍यांनी केली नाहीच उलट आहे त्या ठाण्यालाही आता बकाल स्वरूप यायला लागला. याला जेवढं मनपाचं प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच सत्ताधारीही.

close