दूध प्रकल्पाच्या वादातून गणेश कुलकर्णींची हत्या !

November 13, 2011 12:21 PM0 commentsViews: 4

अमेय तिरोडकर,उपळाई, सोलापूर

13 नोव्हेंबर

माढाचे सरपंच आणि प्रगतीशील शेतकरी गणेश कुलकर्णी यांनी उपळाई गावामध्ये अनेक संस्था सुरू करण्याचा धडाका लावला होता. दूध प्रक्रीया उद्योग संस्था ही त्यातलीच एक. आपल्या सहकाराच्या वर्चस्वाला त्यामुळे धक्का लागू शकतो हे त्यांच्या विरोधी गटाने ओळखले. आणि गणेश कुलकर्णी यांचा काटा काढायला त्यांच्या विरोधकांना आणखी एक कारण मिळालं.

गणेश कुलकर्णी यांची हत्या नसती झाली तर आठच दिवसांनी म्हणजे 23 ऑक्टोबर ला गणेश कुलकर्णी आपल्या दूध प्रक्रीया संघाचे उद्घाटन करणार होते. अगदी दिवळीच्या दिवशीच..आता दुध संघाची इमारत अपुरी राहिलेली आहे. गावातल्या शेतकर्‍यांनाही ह्या डेअरीमध्ये अधिकचा भाव मिळेल ह्याची खात्री होती.

उपळाई गावात आरोपी संदीप पाटील ह्याचा वर्चस्वाखाली एक दूध प्रक्रीया उद्योग चालतो. गणेश कुलकर्णींनी आपल्या दूध प्रक्रीया उद्योगाचा परवाना मिळवून थेट संदीप पाटील याच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. ह्यातूनच कुलकर्णी ह्यांना मारलं गेलंय असा आरोप आता उपळाईचे ग्रामस्थ करत आहे.

ग्रामीण भागात सहकार आणि दूध हे प्रचंड पैसा असणारे उद्योग समजले जातात. त्यामुळे सत्ताधार्‍यांना ह्या धंद्यात सर्वसामान्यांनी उतरलेलं आवडत नाही. असा आरोप चंदाराणी आतकर यांनी केला. आतकर यांच्या पतींची हत्या ते सहकार कारखाना टाकण्याच्या वादातूनच काही वर्षांपुर्वी झाली होती.

त्यामुळेच कुलकर्णी यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला संपवण्यात तालुक्यातील सत्ताधार्‍यांचा हात असेल अशी शंका घेतली जातेय. हे सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. आणि म्हणुनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि शेतकर्‍यांचे कैवारी म्हटला जाणार्‍या शरद पवार यांनी त्यांचा पक्षांच्या नेत्यांना झालेल्या घटनेबद्दल जाब विचारला का ? आपल्या मतदार संघातल्या नव्या नेत्याच्या खूनाची चौकशी केली का ? आणि स्वत: ह्या प्रकरणाची चौकशी छडा लावण्यासाठी काय करणार ? ह्या प्रश्नांची उत्तरही द्यावी लागतील.

close