महायुती आता सर्वच निवडणुकात !

November 14, 2011 11:16 AM0 commentsViews: 8

14 नोव्हेंबर

शिवसेना, भाजप आणि आरपीआयने महायुतीची घोषणा केली. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचे महायुतीने जाहीर केले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीनंतर कुणाशी छुपी युती करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून काम करावे पक्षाचा आदेश न मानणार्‍या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आठवलेंनी दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत मुंबईत महायुतीची भव्य सभा घेणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेच्या पातळीवर असलेल्या शिवशक्ती-भीमशक्तीच्या महायुतीची अखेर आज घोषणा झाली. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिका निवडणुका आणि 2014 मधल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार शिवसेना-भाजप आणि आरपीआयनं केला पण महायुतीसमोर भविष्यात अनेक आव्हानंसुद्धा आहेत.

रामदास आठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गोपीनाथ मुंडेंनी महायुतीची अधिकृत घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय युतीचा जन्म झाला. जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली असली तरी काही जागांवर वाद आहेच. पण ते मिटवण्याचा तिन्ही पक्षांचा निर्धार आहे. तर आठवलेंना सत्तेत योग्य वाटा मिळेल असं आश्वासन मिळाल्याने आठवले या महायुतीत सहभागी झालेत.

या महायुतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनीही एक घोषणा करुन टाकली. निवडणुकांनंतर सत्तेसाठी कोणताही नवा पॅटर्न न राबवण्याचा निर्धार आता शिवसेनेनं केला. पण महायुतीसमोर आव्हानंही तेवढीच आहेत. एकंदरीतच जागा वाटप, त्यानंतर तिकीटं न मिळालेल्यांची पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी, आरक्षण आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर आरपीआय आणि शिवसेना भाजपची भूमिका या सगळ्या गोष्टींचा मेळही या नेत्यांना घालावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ही महायुती नेमकं काय चित्र उभं करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

close