‘पांढर्‍या सोन्याचा’ प्रश्न पेटला

November 14, 2011 5:53 PM0 commentsViews: 61

14 नोव्हेंबर

ऊस उत्पादक शेतकर्‍याला सरकारनं दरवाढ दिली असली तरी विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकर्‍याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत. आणि हे सर्व रोखण्यासाठी कापसाला योग्य भाव देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कापसाला 6 हजार रुपये हमी भाव देण्याच्या मागणीसाठी अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी तुरुंगातूनच उपोषण सुरु केलं आहे. राणा यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यातल्या तिवसा गावाजवळ चक्का जाम करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आमदार राणांसह 100 कार्यकर्त्यांना अटक केली. जोपर्यंत कापसाला 6 हजार रुपए हमी भाव मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेऊ, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

अमळनेर इथे कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी कापसाला 6 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन केलं. शेतकर्‍यांनी राज्य महामार्ग क्रमांक 6 अडवून धरला होता. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत महामार्गावर कापूस फेकला. शेतकर्‍यांनी संतप्त होतं रस्त्यावर टायरही जाळली. या प्रकरणी पोलिसांनी 50 शेतकर्‍यांना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्याातील तिवसाजवळ आंदोलनकांनी राज्य महामार्ग 6 वर चक्का जाम केला. आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन झालं.

तर मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये शेंद्राजवळ कापसाच्या भावासाठी कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 1 तास चक्का जाम आंदोलन केला. या आंदोलनात शेतकर्‍यांबरोबरचं महिलांनीही सहभाग घेतला होता. सरकार कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप करत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

close