मध्यप्रदेशमध्ये 2010 साली 1 लाख बालकांचा भूकबळी

November 14, 2011 6:01 PM0 commentsViews: 17

14 नोव्हेंबर

आज देशभरात बालदिन साजरा होतोय. पण मध्यप्रदेशातली वस्तुस्थिती हादरवून टाकणारी आहे. मध्य प्रदेशात कुपोषणाची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. काही अहवालांनुसार 2010 साली राज्यात एक लाख बालकांचा भूकबळी गेलाय.

मध्यप्रदेश सरकारच्या दुर्लक्षामुळे हजारो टन धान्याची नासाडी होते. ही नासाडी थांबली असती तर कदाचीत या चार वर्षाच्या दीपूला जीवदान मिळालं असतं. दीपू अतिशय कमजोर झाला. तो औषधालाही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे स्वत:च्या बाळाला हळूहळु मरताना बघण्यापलीकडे हे आई-वडिलही काही करु शकत नाही.

सहारिया समाजातल्या या लोकांकडे अंत्योदय कार्ड आहेत. या कार्डवर त्यांना स्वस्तात धान्य मिळू शकतं. पण या लोकांना त्याची जाणीवच नाही. दीपूबरोबर आम्हीसुद्धा जवळच्या पुनर्वसन केंद्रात गेलो. पण दीपूची परिस्थिती इतकी वाईट होती की या केंद्रातील अधिकारीसुद्धा हतबल होते. शिवपुरी जिल्ह्यात सहारिया समाजात कुपोषणाची समस्या अतिशय गंभीर आहे.

कलेक्टर जॉन किंग्सले म्हणतात, प्रशासनाकडे येण्याची या समाजातल्या लोकांची इच्छाच नाही. पण आम्ही काम करतोय. सहारिया समाजतल्या प्रत्येक नोंदणीधारकाला अंत्योदय कार्ड देण्यात आलंय. पण तरीही समस्या संपलेली नाही, हे आम्ही मान्य करतो. भांक्री गावात राहणारी उमेदा. उमेदाचा तिसरा मुलगा गुड्डू याचा एक दिवस आधी मृत्यू झाला.

कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होत आहे. पण राज्य सरकारला हे मान्य नाही. एका आरोग्य सर्वेक्षणानुसार 2010 साली राज्यात एक लाख 8 हजार बालकांचा मृत्यू झाला. तर मध्य प्रदेश सरकारनुसार हा आकडा फक्त 23 हजार आहे. यावरुन राज्य सरकार या प्रश्नावर किती गंभीर आहे, ते कळतं.

close