‘पांढर्‍या सोन्याकडे’ सरकारचे दुर्लक्ष !

November 17, 2011 2:24 PM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर

कापसाला 6 हजार रुपये हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन सुरुच आहे तर दुसरीकडे सुरूवातील सरकारने उचलेलं पाऊल आता कुठे तरी अडकले आहे. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक घेतली मात्र या बैठकीत कोणताच निर्णय निघाला नाही.

मुख्यमंत्र्यांची बैठक तोडग्याविना

कापूसप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झालाच नाही. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आढावा घेतला गेला. त्याचबरोबर कापसाला हमीभाव वाढवून दिला तर सरकारवर पडणार्‍या अतिरिक्त भाराचीच चर्चा बैठकीत झाली. फक्त शेतकर्‍याला हेक्टरी 5, 000 रुपये अनुदान देता येईल का याविषयी चर्चा करण्यात आली आणि एवढीच काय ती बैठकीत सकारात्मक बाजू होती.

त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देता येईल असं काहीही या बैठकीतून निष्पन्न झालं नाही. त्यामुळे सरकार आता कापसाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीत सत्ताधरी विरोधकांसमोर कापसाच्या हमीभावाविषयी त्यांच्या अडचणी सांगणार आहे. ऊसापाठोपाठ कापसाच्या आंदोलनानंही सरकार चांगलचे अडचणीत आलं आहे. त्यामुळे आता सगळ्या पक्षांना विचारात घेऊन भूमिका मांडायचा सरकारचा विचार दिसतोय.

रवी राणांची तब्येत खालावली

तिकडे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. उपोषणामुळे राणांची तब्येत आता खालवली आहे. राणांची शुगर कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्याची शक्यता आहे. तुरूंगात रवी राणांसोबत अनेक कार्यकर्ते आणि कैदीही उपोषणाला बसले आहेत. त्यातल्या 5 कार्यकर्त्यांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कापूस प्रश्नी आंदोलन केल्यामुळे त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच उपोषणाला बसले आहे. राणा यांचे उपोषण तुरूंगात सुरू आहे तर त्यांच्या पत्नी नवनीत कौरही शेकडो महिला कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसल्या आहेत. जळगावमध्ये भव्य रॅली

आज जळगावमध्ये कापसाला हमी देण्याच्या मागणीसाठी भाजपने मोठी रॅली काढली. या रॅलीत शेकडो शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त भाग घेतला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले होते. जळगाव, धुळे, नंदूरबारच्या 15 तालुक्यांतून यासाठी शेतकरी आले. या भव्य रॅलीचा शेवट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर झाला. रॅलीची सांगता होताचा रॅलीचे सभेत रुपांतर झाले. या रॅलीमुळे रॅलीमुळे शहरातील वाहतूक मात्र काही काळ खोळंबली होती.वाशीममध्ये मनसेचा रास्ता रोकोवाशीम जिल्ह्यात तिसर्‍या दिवशीही कापूस प्रश्नावर आंदोलन सुरुच आहे. कारंजा दत्तमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी, नागपूर- वाशीम रोड 1 तास रोखून धरला. कापूस आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव देण्याची मागणी कार्यकर्त्यांची आहे. कारंजा लाड इथ हे आंदोलन झालं. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळले, यावेळी 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये शरद पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

close