बेघरांच्या नावे व्होटबँक मजबूत करण्याचा प्रताप !

November 19, 2011 11:29 AM0 commentsViews: 3

विनोद तळेकर, मुंबई

19 नोव्हेंबर

महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सध्या सुरू आहे. पण या मतदार याद्या अद्ययावत करताना फुटपाथवरच आपले संसार मांडलेल्यांची मतदार म्हणून नोंदणी केली जाते आहे. प्रभादेवीच्या नर्दुल्ला टँक मैदानात सुरू असलेल्या या प्रकारात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप शिवसेना आणि मनसेने केला.

नर्दुल्ला टँक मैदान, दादर, मुंबई – 28 असा पत्ता असलेलं रेशन कार्ड बेघर अंत्योदय योजनेअंतर्गत देण्यात आलं आहे. मुंबईत बेघर असलेल्या प्रत्येकाला रेशन दुकानाच्या माध्यमातून किमान धान्य पुरवठा व्हावा, म्हणून राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ही योजना सुरू केली.

पण आता या रेशन कार्डाच्या आधारे या फुटपाथवरच आपले संसार थाटलेल्या या बेघरांचा आपली वोटबँक मजबूत करण्यासाठी उपयोग केला जात आहे. आणि यामागे काँग्रेसचे स्थानिक पुढारी आहेत असा आरोप शिवसेनेने केला. या बेघर लोकांना आपण ओळखत असून त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट करावीत, अशी शिफारस काँग्रेसच्या काही स्थानिक पुढार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. त्याचा हा ढळढळीत पुरावा.

बेघर अंत्योदय योजनेंतर्गत वितरित केलेल्या या अशा रेशनकार्डाच्या आधारे आतापर्यंत 27 मतदारांची नोंदणी नार्दुल्ला टँक मैदान परिसरात करण्यात आलीय, असा आरोप शिवसेनेने केला. आणि हा आरोप जर खरा असेल तर मुंबईभरात या माध्यमातून किती मतदार नोंदवण्यात आले असावेत असा प्रश्न उभा राहातो. त्यामुळे अशी मतदार नोंदणी ग्राह्य मानणार का याबाबतचा खुलासा खुद्द राज्य शासनानेच करावा अशी मागणी आता जोर धरतेय.

राज्य शासनाने 23 मार्च 2004 आणि 5 जून 2010 ला जारी केलेल्या या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की बेघर कुटंुबीयांना वितरित केलेल्या या शिधापत्रिका ओळखपत्रं म्हणून ग्राह्य मानू नयेत. मग ही मतदार नोंदणी कितपत कायदेशीर आहे हा प्रश्न उभा राहतोच..

close