कापूस आंदोलनाला हिंसक वळण;रवी राणा हॉस्पिटलमध्ये

November 19, 2011 5:09 PM0 commentsViews: 10

19 नोव्हेंबर

कापसाला वाढीव हमीभावाच्या मागणीसाठी उपोषण करणार्‍या अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. त्यामुळे त्यांना नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. राणा यांच्या छातीत दुखतं आहे तसेच त्यांच्या किडणीलाही सूज आली आहे. रवी राणा गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करत आहे. त्यांच्या या अवस्थेसाठी सरकारच जबाबदार असल्याची टीका त्यांच्या पत्नी नवनीत यांनी केली. सरकार आता तरी कापूस आंदोलनाकडे लक्ष देईल का असा संतप्त सवाल नवनीत कौर यांनी सरकारला केला.

विदर्भात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कापूस आंदोलनाचा वणवा दिवसेंदिवस पसरत चालला आहे. कापूस आंदोलनात राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. आज दिवसभरात विदर्भासह खान्देशातही आंदोलन करण्यात आली. जळगावमधल्या जामनेर तालुक्यात 4 एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. भाजप कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी हे आंदोलन केलं. प्रवाशांना खाली उतरवून बस फोडण्यात आल्या. रास्ता रोको आणि जाळपोळही करण्यात आली. रिपाईने काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

कापसाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल आणि सोयाबीनला तीन हजार रूपये प्रतिक्विंटल भाव द्या, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज मुंबईत शिवाजी पार्कवरून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. 20 नोव्हेंबरपर्यंत जर सरकारने योग्य भाव दिला नाही तर रिपाई विदर्भ आणि मराठवाड्यात होणार्‍या महायुतीच्या आंदोलनात उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. कापूस प्रश्नी मनसेचे शोले स्टाईल आंदोलन

कापूस, सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी सर्वच स्तरातून आता आंदोलन पेटलं आहे. बरेच राजकीय पक्ष, संघटनांनी या आंदोलनात उड्या घेतल्यानं हे आंदोलन तीव्र होत चाललं आहे. वाशिम मधल्या मंगरूळपीर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांने एक अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. बी.एस.एन.एल. च्या टॉवरवर चढून हे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

जोपर्यंत कापसाला वाढीव हमीभाव मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशा प्रकारची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. या आंदोलनात मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील मालपाणी आणि दोन कार्यकर्ते सामील झाले आहे. या टॉवर आंदोलनाला 19 तास उलटून गेले आहेत. पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणा त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर सरकारने हे आंदोलन हानून पाडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर टॉवरवरून उडी मारण्याचा इशारा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला. नागपुरात भाजपचा चक्का जाम आंदोलन

कापसाला 6 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नागपूर – हैदराबाद मार्गावर भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. मंुबई नागपूर हायवेवर खामगाव इथं आज भाजप नेते पांडूरंग फुंडकर आणि त्यांच्या समर्थकांनी एक तास रास्ता रोको केला. कापसाला आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळावा यासाठी आज हा रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाची वेळी पोलिसांनी पांडुरंग फुंडकरांसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

close