बसमध्ये स्कार्फ न घालण्याचा नागपूर पालिकेचा फतवा

November 21, 2011 4:01 PM0 commentsViews: 18

अखिलेश गणवीर, नागपूर

21 नोव्हेंबर

नागपूर महानगर पालिकेने शहरात सुरू केलेली स्टार बस सेवा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने वादात सापडली आहे. कधी अपघातासाठी, कधी पार्किंगच्या प्रश्नासाठी तर कधी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी.. पण यावेळी स्टार बसचा जरा वेगळाच प्रश्न आहे. स्टार बस प्रशासनाने बसमध्ये प्रवाश्यांनी चेहर्‍यावर स्कार्फ बांधू नये असा फतवा काढला. आणि यामुळेच महिला प्रवाश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा म्हणून महापालिकेनं स्टार बस सेवा सुरू केली. ही स्टार बस सेवा चालविण्यासाठी महापालिकेने "वंश" या खाजगी कंपनीला याचं कंत्राट दिले आहे. दरदिवशी दोन लाख प्रवासी या बसने प्रवास करतात. पण बोगस पासधारकांची संख्या वाढल्याचे कारण देत स्टार बस प्रशासनाने प्रवाशांनी बसमध्ये चेहर्‍याला स्कार्फ बांधू नये असा फतवा काढला. तर नियम मोडणार्‍यांना 100 रुपये दंड आकारला जातोय.

फक्त ओळख पटवण्यापुरता स्कार्फ काढून चेहरा दाखवा, तसेच बोगस पासधारक आढळले तर शंभर रुपये दंड आकारला जाईल असं व्यवस्थापक सांगत आहे. पण बसमध्ये लावलेली सूचना काही तरी वेगळंच सांगतेय. त्यामुळे या नियमाच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाच गोंधळात पडल्याचं दिसतंय. तर महिला प्रवाशांनी या नियमालाच विरोध केला आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात प्रदुषणा सामना करण्यासाठी स्कार्फचा वापर तसा सर्वमान्य आहे. त्यामुळे अशाप्रकारे स्कार्फची सक्ती करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न प्रवासी विचारत आहे.

close