कोल्हापुरात जातपडताळणी कार्यालयाचा अनागोंदी कारभार !

November 21, 2011 3:36 PM0 commentsViews: 176

प्रताप नाईक, कोल्हापूर

21 नोव्हेंबर

कोल्हापूर विभागातील जात पडताळणी कार्यालयातील अनागोंदी कारभाराचा फटका कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मागास आणि इतर मागास विद्यार्थांना बसतोय. त्यामुळे इंजिनीअरिंग आणि मेडिकलच्या अनेक विद्यार्थाचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांचे जात पडताळणी प्रमाणपत्र जातपडताळणी कार्यालयातील अधिकार्‍यांनी शैक्षणिक संस्थाकडे अजुनही पाठविलेलं नाही. संबंधीत कॉलेजनी विद्यार्थांना 30 नोव्हेंबरच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा कॉलेजमधील प्रवेश रद्द करण्याचा इशारा दिला. त्यामुळे हे सगळे विद्यार्थी हवालदिल झाले आहे. आपलं जात पडताळणी प्रमाणपत्र आणण्यासाठी बरेच विद्यार्थी कोल्हापुरातील कसबा बावडा इथं असणार्‍या जातपडताळणी ऑफिसचे खेटे मारत आहे. पण त्यांना अद्याप प्रमाणपत्र देण्यात आलेले नाहीत.

- जातपडताळणी कार्यालयात त्रिसदस्यीय समिती आहे. समितीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्रकाश पाटील हे रजेवर.- तर उपायुक्त तथा सदस्य सुनिल वारे हे निवडणूकीच्या कामात गुंतले आहे.- तर तिसरे अधिक ारी सहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव हे ऑफिसमध्ये हजर आहेत. पण ते एकटे दाखला देऊ शकत नाहीत.

ह्या तिघांही अधिकार्‍यांची सही असल्याशिवाय विद्यार्थांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळु शकत नाही. त्यामुळे विद्यार्थांची चांगलीच गोची झालीय.तर दुसरीकडे आपल्याकडे आलेले सर्व दाखले आपण वेळेवर देत असल्याचा दावा ऑफिसमध्ये हजर असणार्‍या सहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव रविंद्र कदम यांनी केला.

एकीकडे जातपडताळणी ऑफीसमधले अधिकारी जागेवर नाहीत. असणारे अधिकारी दाखले देऊ शकत नाहीत. त्यामुळे कॉलेजमध्ये 30 नोव्हेंबरच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र कसं सादर करायचं अशा कात्रीत विद्यार्थी सापडले आहे.

close