संसद हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह !

November 21, 2011 4:47 PM0 commentsViews: 5

21 नोव्हेंबर

उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. आणि हे अधिवेशन वादळी ठरणार, हे निश्चित आहे. एनडीएची आज बैठक झाली. त्यात 2 जी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढवण्याची योजना आखण्यात आली. चिदंबरम राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर दोन्ही सभागृहांत बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चिदंबरम बोलायला उभे राहिले की विरोधक निषेधाच्या घोषणा देत सभात्याग करतील, हे आता उघड झालं आहे.

दिल्लीत सध्या थंडीला सुरुवात झालीय. पण याच थंडीत सुरु होत असलेलं संसदेचं अधिवेशन चांगलंच तापणार अशी चिन्हं आहेत. सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे ओहत. हिवाळी अधिवेशनसुद्धा गेल्या पावसाळी अधिवेशनासारखच वादळी ठरणार याची सरकारलाही जाणीव आहे. गेल्या अधिवेशनात टीम अण्णा आणि विरोधक यांच्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली होती.

हे अधिवेशन 21 दिवसांचं आहे. प्रत्येक दिवशी दोन विधेयकं पारित करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारला एकूण 31 विधेयकं मंजूर करायची आहेत तर 23 विधेयकं पटलावर मांडायची आहेत.

महत्त्वाची विधेयकं

- लोकपाल विधेयक- व्हिसल ब्लोअर बिल- ज्युडिशिअल अकाउंटीबिलिटी बिल- अन्न सुरक्षा विधेयक- करचुकवेगिरी प्रतिबंधक (सुधारणा) बिलयाशिवाय काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर करण्याचा सरकारचा विचार आहे.

महत्त्वाचे निर्णय

- मल्टी ब्रँड रिटेलमध्ये परकीय गुंतवणूक- हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणूक- निवृत्ती वेतनात थेट परकीय गुंतवणूक- नवीन उत्पादन धोरण आणि कंपनीज लॉ- दूरसंचार धोरणात सुधारणाबचावासाठी सरकारची तयारी पूर्ण असली तरी एवढ्यावर विरोधकांचं समाधान होणार नाही, हे निश्चित आहे.

close