कापूस प्रश्नी संसदेत घोषणाबाजी

November 22, 2011 10:25 AM0 commentsViews: 6

22 नोव्हेंबर

महाराष्ट्रात पेटलेला कापसाचा प्रश्न आज संसदेतही पोहोचला. वाढीव हमीभावाच्या मागणीसाठी लोकसभेत शिवसेना भाजपच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. संसदेच्या बाहेरही कापूस नेत या खासदारांनी निदर्शनं केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टीही या आंदोलनात सहभागी झाले होते. कापसाला किमान हमीभाव 6 हजार रूपये द्या अशी मागणी करत या खासदारांनी निदर्शनं केली.

ऊस आंदोलनानंतर विदर्भात कापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. कापसाच्या प्रश्नी बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सहा दिवसांचे तुरुंगात उपोषण केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्वासन दिल्यानंतर राणा यांनी उपोषण मागे घेतले. वीस दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची मात्र सरकारकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतही कोणताचा तोडगाही निघू शकला नाही. आज कापसाचा प्रश्न संसदेच्या दोन्ही सभागृहात पोहोचला. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. कापसाला सहा हजार हमीभाव देण्यात यावा अशी मागणी खासदारांनी लावून धरली. खासदारांच्या या गोंधळामुळे दोन्ही सभागृहातील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

close