आमदारकीच्या उमेदवारीसाठी मुंबई शिवसेनेत चुरस

November 19, 2008 6:11 AM0 commentsViews: 4

19 नोव्हेंबर, मुंबईविनोद तळेकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत. सध्या आमदार खासदार असलेल्यांनी आपल्या जागा टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर इतरांनी त्या जागी आपली वर्णी लागावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केलीय. शिवसेनेत. असाच एक कलगी तुरा रंगतोय तो महापौर शुभा राऊळ आणि उत्तर मुंबईचे विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यात.उत्तर मुंबईच्या दहिसर भागात लागलेले काही बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. महापालिकेच्या नव्या प्रकल्पावद्दलची माहिती त्यावर छापण्यात आली आहे. महापालिकेच्या या बॅनरवर महापौर शुभा राऊळ यांचा फोटो तर आहेच, पण त्याचबरोबर बाळासाहेब आणि उद्धव यांचेही फोटो आहेत. तसंच या विभागातल्या छोट्या मोठ्या स्थानिक पदाधिकार्‍यांचीही नावं आहेत. पण नाव नाही ते या भागाचे विभागप्रमुख विनोद घोसाळकरांचं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भागात बोरिवली वेस्ट, दहिसर आणि मागाठणे असे तीन मतदारसंघ आहेत. यापैकी एक बोरिवली हा भाजपच्या गोपाळ शेट्टींचा मतदारसंघ, तर खेड मतदारसंघ फेररचनेत गायब झाल्याने मागाठण्यातून विरोधी पक्षनेते रामदास कदम इच्छुक आहेत. त्यामुळे महापौर शुभा राउळ आणि विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांचं कार्यक्षेत्र असलेल्या दहिसर भागात आता या दोघांमध्ये चुरस आहे. त्यामुळेच हा वाद उभा राहिला आहे.विनोद घोसाळकरांनी मात्र अशा कोणत्याही वादाचा इन्कार केला आहे. 'असा कोणताही वाद आमच्यात नाही. आणि या सगळ्या भागाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि ती पार पाडण्याचा माझा प्रयत्न आहे. मी इच्छुक आहे की नाही त्या पेक्षा उद्धवसाहेब काय ठरवतात ते महत्वाचं' असं ते म्हणाले. आता यावर उघड चर्चा सुरू झाल्यावर मात्र शिवसेनेने त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. पण येत्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर असे वाद वाढतच जाणार, यात शंका नाही.

close