पवारांवरील हल्ला मराठी माणूस सहन करणार नाही – शिवसेनाप्रमुख

November 24, 2011 6:26 PM0 commentsViews: 12

24 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर हात टाकणे बरोबर नाही. पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे त्यांचं दिल्लीत मोठ स्थान आहे. त्यांच्यावर हल्ला हा घृणास्पद आहे पवारांवरचा हल्ला मराठी माणूस कधीच सहन करणार नाही असं स्पष्ट मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलं. शिवसेनाप्रमुखांनी आज जेष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांची पुण्यात जाऊन भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

जेष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे हे चांगले मित्र.. मागील महिन्यात आर.के.लक्ष्मण यांनी नवदी गाठली. आज आपल्या मित्राला भेटण्यासाठी खुद्द बाळासाहेब ठाकरे कितेक दिवसानंतर पुण्यात आले होते. बाळासाहेबांची भेटीने लक्ष्मण यांना गहिवरुन आलं. यावेळी लक्ष्मण यांनी 'कॉमन मन' काढून बाळासाहेबांना भेट दिली. या भेटीनंतर बाळासाहेबांनी पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली. आपल्या ठाकरी शैलीत बाळासाहेबांनी चौफेर फटकेबाजी केली. आज शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बाळासाहेबांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पवार आणि माझे राजकारणात अनेक वेळा आरोपप्रत्यारोप झाले असतील. पण पवार आणि आमचे व्यक्तीगत नाते चांगले होते. सुप्रिया सुळे खूप लहान असतानाचा किस्साही बाळासाहेबांनी सांगितला. पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे त्यांचे दिल्लीत मोठे स्थान आहे. त्यांच्यावर हात टाकणे बरोबर नाही जर विरोध करायचा होता तर काळे झेंडे दाखवा, सभेत गोंधळ घालावा पण पवारांसारख्या जेष्ठ नेत्यावर हात टाकणे घृणास्पद आहे पवारांचा अपमान मराठी माणूस कधीच सहन करणार नाही अशा शब्दात बाळासाहेबांनी आपली नाराजी व्यक्त केली.

close