पवारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत कडकडीत बंद

November 25, 2011 5:34 PM0 commentsViews: 9

25 नोव्हेंबर

शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बारामतीतल्या सर्व शाळा आणि कॉलेजेस आज बंद ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने अहमदनगर जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. बारामती शहरातील संपूर्ण व्यवहार बंद आहेत. बारामती एमआयडीसी परीसरातील सर्व औद्योगिक व्यवसाय बंद करून बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्सच्यावतीने अण्णा हजारे आणि हरविंदरसिंग यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. तर, नाशिक जिल्ह्यामध्ये पवारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नामपूर, तहराबाद इथं रास्ता रोको केला. तर सटाणा बंद करण्यात आलं आहे.

पुण्यात शांततेत बंद

शरद पवारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे बंद पुकारला होता. हा बंद सुरळीत पार पाडला. या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या बंदला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला, दिवसभर पुण्यातली दुकानं, हॉटेल्स बंद होती. त्याबरोबरचं अनेक ठिकाणी शाळांनादेखील सुट्टी देण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पीएमपी बस सेवा सुरळीत सुरु होती.

सांगलीत आज जिल्हा बंद

सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हा बंदचे आवाहन केले होते. शहरातील गणपती पेठ, कापड पेठ, मार्केट यार्डसह सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत.

मनसे आमदारांनी घेतली पवारांची भेट

दरम्यान, शरद पवारांवरील हल्ल्याच्या निषेध करत आज मनसे आमदार शरद पवार यांची भेट घ्यायला दिल्लीत पोहचले. मनसे आमदार बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली.

close