गावकर्‍यांच्या मारहाणीत वाघाचा मृत्यू झाल्याचा वन्यप्रेमी संघटनांचा दावा

November 19, 2008 11:08 AM0 commentsViews: 6

कल्पना नळसकर19 नोव्हेंबर, चंद्रपूर. चंद्रपूरमधील मेंढकी गावातील गावकर्‍यांनी मारहाण केल्यामुळेच वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मेंढकी गावातून 10 दिवसांपूर्वी वनखात्यानं वाघाचे दोन जखमी बछडे नागपूरच्या ' महाराज बागेत ' आणले होते. त्यापैकी एकाचा मंगळवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बछड्यांना गावकर्‍यांनी बेदम मारहाण केली होती, असं ' वन्यजीव प्रेमी ' या संघटनेनं सांगितलंय. ' त्या दिवशी दोन ते तीन हजार लोकांचा जमाव होता. आम्हाला वाघ नको, त्यांना घेऊन जा, असं गावकरी सांगत होते. त्यांनी त्या वाघांना दगडांनी मारलं देखील होतं ', असं वन्यजीव प्रेमी पूनम धनवटे सांगत होत्या. हे सगळं पूनम धनवटे यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. 1 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील मेंढकी गावाजवळ लोकांना दोन वाघ दिसले होते. तेव्हा त्यांनी त्यांची अतिशय वाईट अवस्था केली होती. ' याआधी जंगलात सांभर, कोल्हे असे प्राणी होते. वाघ त्यांची शिकार करायचा पण आता ते नाही. तेव्हा वाघ आता गाई, शेळ्या आणि मेंढ्यांची शिकार करतो. हे जंगल म्हणजे प्राण्यांचं घर पण आता या जंगलावर लोकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली त्यामुळे प्राण्यांनी जायचं कुठे, हा प्रश्न निर्माण झालाय ' असं पूनम धनवटे पुढे म्हणाल्या. चंद्रपूरच्या आसपासच्या जंगलात आधीपासूनच वाघ राहतात. गेल्या दोन वर्षांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे थांबवण्यासाठी वन्यप्रेमींकडे उपायही आहे. ' जर गावकरी जंगलात गेले तर आणि त्यांना वाघ दिसला तर त्यांनी त्यांची माहिती वनविभागाला द्यावी, अशी मानसिकता गावकर्‍यांमध्ये तयार करावी लागेल.अशी माहिती जर गावक-यांनी दिली तर वनविभागाला यातून मार्ग काढण्यास सोप जाईलं. आणि वन विभागाची टास्क फोर्सलाही मदत होईल. ', असं वन्यजीव प्रेमी हर्षवर्धन हटवार यांनी सांगितलं. ताडोबामध्ये सध्या 40 वाघ आहेत आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वन विभागाची .ती जबाबदारी वनविभाग कशी पार पाडते ते येणार्‍या दिवसांत कळेलच. ' फक्त ताडोबाचं जंगल नाही तर रेव्हन्यू डिपार्टमेंट, प्रायव्हेट लॅन्डसुद्धा आहे, तिथे मोठ्या प्रमाणात जंगल आहे, तिथे लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे ', असं प्रधान मुख्य वनसंरक्षक बी . मुजूमदार यांनी सांगितलं.

close