FDIच्या विरोधासाठी भारत बंद; संसदेचं कामकाज ठप्प

December 1, 2011 11:27 AM0 commentsViews: 7

1 डिसेंबर

राज्यासह देशभरात व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. एफडीआयच्या विरोधात आज व्यापारी संघटनांनी भारत बंद पुकारला. हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं काम ठप्प होतं. रिटेलमधल्या FDI च्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी गदारोळ केला. युपीएच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांची पंतप्रधानांनी FDI च्या मुद्द्यावर भेट घेतली. डीएमके आणि तृणमूल या पक्षांना सभागृहात FDIवर चर्चा हवी आहे, असं सूत्रांकडून समजतंय.

मुंबईत माथाडी कामगारांनीही आजच्या बंदला पाठिंबा दिला. थेट परकीय गुंतवणुकीमुळे आमचं कुटुंब रस्त्यावर येईल, असं या माथाडी कामगारांचं म्हणणं आहे. तर जयपूर, कोलकत्ता, लखनौमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला.

नवी मुंबई

नवी मुंबईचं APMC मार्केट, पुण्याचा लक्ष्मी रोड तसंच नागपूरचं मार्केट ही एरवी गजबजलेली ठिकाण आज पूर्ण पणे बंद होती. इथले सगळे व्यवहार ठप्प होते.

नाशिक

नाशिकमध्ये व्यापा-यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मेनरोड, महात्मा गांधी रोड या बाजारपेठेतली काही दुकानं बंद होती. पण शहरात बाकी व्यवहार सुरळीत सुरू होते. एफडीआयच्या निषेधात व्यापार्‍यांचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात भाजपच्या नेतृत्वाखाली हातावर मोजण्याएवढ्याच व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

नागपूर

आज नागपुरातील सर्व बाजारपेठा बंद करण्याचं आवाहन व्यापारी संघटनानंी केलं होतं. यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. पण शहरातील काही भागांत रिटेल व्यावसायिकांनी आपली दुकानं सुरु ठेवल्याचं चित्र आहे. शहरातील महाल, सदर भागांत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. मात्र बर्डी आणि गांधीबाग भागात कडकडीत बंद होता.नागपूर शहरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बर्डी, गांधीबाग या भागात कडकडीत बंद आहे.पण शहरातील इतर बाजारपेठेत व्यवहार मात्र सुरळीत सुरु असल्याचं चित्र आहे.

पुणे

पुण्यातही व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. लक्ष्मी रस्त्यावरची बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. तसंच मार्केट यार्ड आणि पुणे परिसरातल्या इतर व्यापार्‍यांनीही आपली दुकानं बंद ठेवली. या बंदमध्ये अनेक व्यापारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला.

close