मनसेच्या परीक्षेला वर्ग हाऊसफूल

December 4, 2011 4:47 PM0 commentsViews: 4

04 डिसेंबर

हातात पेन,पॅड घेऊन आणि डोक्यात पेपरात काय येईल या विचाराने चिंतेत पडलेले भावी नगरसेवकांनी आज शाळेची पायरी चढली.आज ऐन रविवारी शाळेला सुट्टी असतांना शाळेत ही परीक्षा कोणती आणि अन् परीक्षेला आलेले विद्यार्थ्यांचे वय पाहून लोकही भांबावून गेले. मात्रही परीक्षा होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. राज ठाकरे यांनी येत्या निवडणुकांसाठी आणि विधानसभासाठी उमेदवाराला तिकिट देण्यासाठी परीक्षा घेतली जाईल अशी घोषणा केली आणि आज ही परीक्षा पार पडली आहे. मोठ्या संख्येनं उमेदवारांनी ही परीक्षा दिली. एकूण 6 महापालिका क्षेत्रात ही परीक्षा झालीय. मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, आणि नागपूर या महापालिका निवडणुकांसाठी ही परीक्षा झाली आहे.

पुण्यात 700 उमेदवारांनी दिली परीक्षा

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असेलेल्या पुण्यात जवळपास 700 इच्छुक उमेदवारांनी मनसेची परीक्षा दिली. एकाचवेळी परीक्षेला आलेले वडील आणि मुलगी, लिहिता-वाचता येत नसतांनाही परीक्षेला बसलेली महिला असे अनेक उमेदवार इथं पाहायला मिळाले. आता परीक्षेनंतर सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुलाखतीकडे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ही मुलाखत घेणार आहेत.

नागपुरात 101 उमेदवार वर्गात

महापालिकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी होण्याची इच्छा बाळगणार्‍या इच्छुक उमेदवारांसाठी आज मनसे च्यावतीने नागपुरात सुध्दा परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेला नागपुरात चांगला प्रतिसाद मिळाला. 300 अर्ज या परिक्षेसाठी आले हाते. या पैकी 104 अर्ज वैध ठरविण्यात आले. या पैकी आज 101 उमेदवारांना ही परीक्षा दिली आहे. नागपुरच्या साऊथ पॉईंट स्कुलमधे ही परीक्षा घेण्यात आली होती.परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून खास मंुबईहून पर्यवेक्षक आले होते. दीड तासाच्या या परिक्षेत नागपूर महापालिका संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.

ठाण्यात अमराठी उमेदवारांनी दिली परीक्षा

ठाण्यातील पाचपाखाडीतल्या सरस्वती शाळेत आज मनसेची महापलिका निवडणुकीपुर्वीची परीक्षा झाली. यात अनेक अमराठी उमेदवारांनी परीक्षा दिली. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातील जनतेचं भलं करण्याची तालिम यात दिसत होती. ठाण्यात 800 उमेदवारांनी अर्ज केले होते. पण परिक्षेच्या भितीनं मात्र प्रत्यक्षात 401 उमेदवारांनीच परिक्षा दिली. मनसेच्या या उपक्रमाची उमेदवारांनी स्तुती केली आहे.

close