टू जी प्रकरणी चिदंबरम यांना धक्का

December 8, 2011 9:44 AM0 commentsViews: 1

08 डिसेंबर

2जी प्रकरणी ए. राजानंतर आता केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची खुर्चीसुद्धा धोक्यात आली आहे. विशेष सीबीआय कोर्टाने आज चिदंबरमविरोधातली याचिका दाखल करुन घेतली. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केलीय. पण कोर्टात 17 तारखेला स्वामी यांची पेशी होईल. त्यांनंतर चिदंबरम यांना समन्स बजावायचे की नाही, हे कोर्ट ठरवेल. चिदंबरम आणि राजा या दोघांनी मिळून 2जी स्पेक्ट्रमची किंमत ठरवली. त्यामुळे चिदंबरम यांनासुद्धा सहआरोपी करुन घ्यावं, अशी स्वामी यांची मागणी आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासाठीसुद्धा आता धोक्याची घंटा वाजलीय. किमान जनता पार्टी अध्यक्ष सुब्रमण्याम स्वामी यांना तरी असेच वाटतं आहे. स्पेशल सीबीआय कोर्टाने स्वामी यांची चिदंबरविरोधातली याचिका दाखल करुन घेत स्वामी यांना हजर राहण्याचे आदेश दिलेत. 2जी प्रकरणी चिदंबरम यांना आरोपी करण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल असल्याचं स्वामी म्हणतात.

2 जी प्रकरणी चिदंबरम यांचा सहभाग सिद्ध करण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या तत्कालीन सहसचिव सिंधुश्री खुल्लर यांची कोर्टात तपासणी करायला परवानगी द्यावी, अशी विनंती स्वामी यांनी 2जी कोर्टाला केली होती. तसेच सीबीआयसुद्धा चिदंबरम यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे सीबीआच्या सहसंचालकांचीही तपासणी करण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. या दोन साक्षी नोंदवायच्या का यावर कोर्ट 17 तारखेला निर्णय देईल. पण विरोधकांनी आधीच चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

चिदंबरम यांनी कोर्टाच्या निर्णयावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. संसदेत विरोधकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. पण सरकार आणि काँग्रेस दोघंही चिदंबरम यांच्या पाठिशी ठाम उभे आहेत. 2 जी प्रकरणी चिदंबरम यांची अडचण आता आणखी वाढणार, असंच चित्र सध्या दिसतं आहे.

close