सिब्बल यांनी केली चिदंबरम यांची पाठराखण

December 10, 2011 10:28 AM0 commentsViews: 6

10 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी सरकारकडून गृहमंत्री पी चिदंबरम यांचा पुन्हा एकदा बचाव केला जात आहे. कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन पी चिदंबरम यांचा बचाव केला. लायसंन्स वाटपात चिदंबरम यांची कोणतीही भूमिका नसल्याचं सिब्बल यांनी स्पष्ट केलं. गुरुवारी चिदंबरम यांना सहआरोपी करण्याच्या सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर विशेष कोर्टाने दोन अधिकार्‍यांच्या चौकशीला परवानगी दिली. या अधिकार्‍यांच्या चौकशीतून चिदंबरम यांचा या घोटाळ्याशी संबंध आहे हे सिद्ध होईल असा दावा स्वामी यांनी केला.

या अधिकार्‍यांची चौकशी का करावी हे आधी स्वामी यांना मांडावे लागेल. 17 डिसेंबरला सुनावणीच्या दरम्यान स्वामी यांना शपथेवर त्यांची बाजू मांडावी लागेल. आणि त्यानंतर अधिकार्‍यांची चौकशी होऊ शकेल. अर्थमंत्रालयाचे तत्कालीन सहसचिव सिंधुश्री खुल्लर आणि सीबीआयचे सहसंचालक एच.सी.अवस्थी यांची चौकशी आता होणार आहे. आता या दोघांच्या चौकशीतून चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे आढळले तर कोर्ट चिदंबरम यांना आरोपी करण्याबाबत निर्णय देणार आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 डिसेंबरला होणार आहे. या प्रकरणी दोन्ही सभागृहाचे कामकाज विरोधकांनी बंद पाडले होते. आज कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन चिदंबरम यांची पाठराखण केली.

close