काळ्या पैशाबाबत भाजपची मागणी फेटाळली

December 14, 2011 5:06 PM0 commentsViews: 2

14 डिसेंबर

संसदेत काळ्या पैशांचा मुद्दा आज गाजला. लोकसभेत आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काळ्या पैशाच्या मुद्द्यावरुन स्थगन प्रस्ताव मांडला. पण हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. कर चुकवून स्विस बँकेत काळा पैसा जमवणार्‍यांची नावं जाहीर करावी, अशी मागणी अडवाणी यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. पण वेगवेगळ्या देशांशी केलेल्या करारामुळे अशा प्रकारे खातेदारांची नावं उघड करु शकत नसल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

याविषयावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत वाट बघा असा सल्लाही मुखजीर्ंनी दिला. तसेच परदेशातल्या काळ्या पैशाबाबत विरोधी पक्ष आणि माध्यमांमध्ये जे आकडे दिले जातात त्यावरही मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारची कुठलीच अधिकृत आकडेवारी नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. स्थगन प्रस्तावावर झालेल्या चर्चेवेळी प्रणव मुखर्जी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

दरम्यान, यूपीए सरकारमुळे कर चुकवणार्‍यांना मॉरिशिअरचा मार्ग खुला झाला अशी परखड टीका भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. तर काळ्या पैशांची समस्या यूपीएच्या काळातच जन्माला आली, हे म्हणणं चुकीचं असल्याचा युक्तीवाद काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी केला.

close