गदिमा स्मारक 5 वर्षांपासून कागदावरच

December 15, 2011 3:14 PM0 commentsViews: 50

15 डिसेंबर

महाराष्ट्राचे लाडके कवी ग.दि. माडगूळकर यांच्या पुण्यातील स्मारकाकरता मंजूर झालेला अडीच कोटीचा निधी अन्य कामाकरता खर्ची पडला आहे. तसेच 5 वर्षांपूर्वी गदिमांचे स्मारक मंजूर होऊनसुध्दा अजूनपर्यंत स्मारकाची एक वीटही ठेवली गेली नाही अशी खंत गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांनी जाहीरपणे व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे गदिमा पुरस्कारांचे वितरण पुण्यात झालं. या कार्यक्रमात बोलताना माडगूळकर यांनी पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दलची व्यथा जाहीरपणे मांडली.

2006 साली मोहन धारिया यांच्या गदिमांचे स्मारक पुण्यात व्हावे या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी प्रतिसाद देत स्मारक बांधण्याचं आश्‍वासन दिलं. 2007 च्या महापालिका निवडणुकांच्या जाहीरनाम्यातही राष्ट्रवादीने स्मारकाचा समावेश केला. सध्याचे विधानपरिषदेचे आमदार आणि तत्कालीन नगरसेवक राष्ट्रवादीचे अनिल भोसले यांनीही गदिमांच्या स्मारकाकरता पाठपुरावा केला पण माशी कुठं शिंकली माहीत नाही आधुनिक वाल्मिकी संबोधल्याजाणार्‍या गदिमांचं स्मारक अजून कागदावरचं आहे असी खंत श्रीधर माडगूळकरांनी व्यक्त केली आणि गदिमा पुरस्कार सोहळ्याला हजर असणार्‍या रसिकांनी हळहळ व्यक्त केली.

close