बरखास्तीच्या निर्णयाचा विधानपरिषदेत मांडला जाणार निषेध प्रस्ताव

December 16, 2011 9:57 AM0 commentsViews: 2

16 डिसेंबर

बेळगाव महानगरपालिका बरखास्त केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं विधान भवन परिसरात निदर्शनं केली. यावेळी शिवेसेनेनं कर्नाटक सरकार बरखास्तीची मागणी केली. त्याचबरोबर बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा अशीही मागणी शिवसेनेनं केली. दरम्यान, या मुद्दावरून दुपारी दोन वाजेपर्यंत विधानसभा आणि विधानपरिषद तहकूब करण्यात आली होती.

विधानपरिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज दुपारी निषेधाचा प्रस्ताव मांडणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी गटनेत्यांची विशेष बैठक बोलावली आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिकेवर केलेल्या कारवाईचा महाराष्ट्र भाजपने तीव्र शब्दात निषेध केला. बेळगावमधील मराठी माणसांच्या पाठिशी आम्ही आहोत असंही विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

तर दिल्लीतही लोकसभेतही बेळगावचा प्रश्न गाजला. कर्नाटक विधानसभा बरखास्त करण्याचा मुद्दा शिवसेनेनं लोकसभेत उपस्थित केला. कर्नाटकमधलं भाजप सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत असून ते तातडीने बरखास्त करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. कर्नाटक सरकार बरखास्तीच्या घोषणाही या खासदारांनी केल्या.

close